शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केल्याचा आरोप करत वंचितच्या युवा आघाडीने निषेध नोंदवला. राज्यात अनेक ठिकाणी आमदार बांगर यांच्या पुतळ्याचे दहन करून वंचितने आपला निषेध नोंदवला. तसेच आमदार संतोष बांगर यांच्यावर जुगार चालवून उदरनिर्वाह करत असल्याचा आरोप केला. संतोष बांगर यांचे ‘वंचित’वरील आरोप बालिश असल्याचं सांगत युवा आघाडीने आमदार संतोष बांगर यांना प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करण्याची मागणी केली. तसेच शिवसेना आमदार संतोष बांगर महाराष्ट्रात कसे फिरतात ते बघूच असा गर्भित इशाराही वंचित बहुजन युवा आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला.
राजेंद्र पातोडे म्हणाले, “शिवसेना आमदार संतोष बांगर यांना अंकगणित आणि बाराखडीची पुस्तके उपलब्ध करून देऊन साक्षर करणार आहे. बांगर यांना बौद्ध समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी वंचितच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. शिवसेनेचा जुगार चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष बांगर या आमदारांनी अकलेचे तारे तोडताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर १००० कोटीचा हास्यास्पद व बालिश आरोप केला होता.”
“शिवसेना आमदार संतोष बांगर यांना आधी प्रौढ शिक्षण शाळेत घालावे”
“वंचित बहूजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडाणी आमदार संतोष बांगर यांना आधी प्रौढ शिक्षण शाळेत घालावे असे निर्देश दिले आहेत. जेणेकरून त्यांना १ हजारावरील शुन्य वाचण्याची अक्कल येईल. आमदार बांगर यांनी दुसरा आरोप बौद्ध समाजावर केला आहे. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. राज्यात जिथे बांगर दिसेल तिथे त्यांना प्रत्युत्तर देण्याचे आदेश युवा कार्यकर्त्यांना दिले आहेत. बांगर यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत किंवा बिनशर्त माफी मागावी. अन्यथा ते राज्यात कसे फिरतात ते बघूच,” असा इशारा राजेंद्र पातोडे यांनी दिला.
हेही वाचा : “मागासवर्गीयांच्या स्वतंत्र बजेटसाठी कायदा करा”; वंचित बहुजन युवा आघाडीची राज्य सरकारकडे मागणी
“एकीकडे मविआमधील मंत्र्यांची जेलमध्ये जाण्याची स्पर्धा लागली आहे, त्याची धग आता मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकापर्यंत पोहोचली आहे. यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आमदार बांगर यांच्यासारखे जुगारी आमदार निरर्थक बडबड करत आहेत,” अशी टीका युवा आघाडीने केली. राज्यात काही ठिकाणी आमदार बांगर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत वंचितने तक्रार अर्ज दाखल केले आहेत.