सांगली : कोल्हापुरात लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना मोटारीवरील ताबा सुटल्याने अंकली पूलावरुन कृष्णा नदीत मोटार कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलासह तिघे ठार तर तिघे जखमी झाले. मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून अपघातग्रस्त सांगलीचे रहिवासी आहेत.
लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने मोटार थेट नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मृतात दोन महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. यातील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत.
हे ही वाचा… Maharashtra Assembly Election Result Live : देवेंद्र फडणवीस यांना काही लोक टार्गेट करत आहेत-भुजबळ
कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटोपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते. त्यांची मोटार जयसिंगपूर हुन सांगली कडे येत असताना अंकली पुलावर गाडीवरील ताबा सुटला आणि थेट नदी पात्रात कोसळली. यामध्ये प्रसाद भलचांद्र खेडेकर (४०), प्रेरणा प्रसाद खेडेकर (३५) , वैष्णवी संतोष नार्वेकर (२३) यांचा मृत्यू झाला तर साक्षी संतोष नार्वेकर (४२), वरद संतोष नार्वेकर (२१) आणि समरजित प्रसाद खेडेकर (५) हे जखमी झाले आहेत.