‘वेळ अमावस्या’ हा सण मराठवाडा विशेषत: उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मार्गशीष अमावसेला खूप उत्साहाने साजरा करतो. आजच्या दिवशी शेतकरी बांधव आपल्या कुटुंबासह शेतात जाऊन पांडवाची तसेच काळ्या आईची व पिकांची यथासांग पूजा करीत असतो. काळ्या आईचे आपण काही देणं लागतो या भावनेतून मोठ्या उत्साहात ही पूजा केली जाते. उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील नागरिक यासाठी आपल्या गावी नक्की जातात. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपल्या मूळ गावी हा सण साजरा करत असत.
ताकाचे अंबिल, ज्वारी व बाजरीचे उंडे या खास ग्रामीण पदार्थाचा आस्वाद शेतकरी आपल्या कुटुंबासह मित्रपरिवारासोबत घेतो. शेतकऱ्यांचा हा एक आनंदोत्सवच असतो.
आज ‘वेळ अमावस्या’ निमित्त राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिह पाटील यांनी आपल्या तेर येथील शेतात जाऊन पूजा केली. ताकाचे अंबिल, ज्वारी व बाजरीचे उंडे, खीर या खास पदार्थांचा आस्वाद सहकारी व सहायकांसोबत घेतला. काळ्या आईला वंदन म्हणून आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मराठवाड्यासह सोलापूर येथील ग्रामीण भागात बळीराजा मोठ्या उत्साहात निसर्ग देवतेची पूजा करतात. वेळ अमावास्या निमित्ताने रविवारी शेतशिवार गजबजला आहे. नैवेद्य तयार करण्यासाठी महिलांची पहाटेपासून लगबग सुरू होती. शिवारातील देवी-देवतांना नैवेद्य देऊन शेतामध्ये पांडव पूजा करण्यात आली. ज्वारीची पाचधाटं एकत्रित बांधून त्याखाली पांडव मांडण्यात आले. त्यासमोर मोगा (मातीचे भांडे) ठेवले. पालेभाज्यांची एकत्रित भज्जीची भाजी अन् बाजरीचे कडबू (उंडे), पुरणपोळी यांचा नैवेद्य त्या भांड्यात ठेवण्यात आला. त्यानंतर डोक्यावर घोंगडी पांघरून ‘चाऊर चाऊर चांगभलं…’ अशी आरोळी ठोकण्यात आली. कर्नाटकच्या सीमावर्ती भागात ‘छज्जी रोटी चवळकी कई चेंगभल्ले…’अशी आरोळी असते. त्यानंतर शेतकरी कुटुंबीय, नातेवाइकांसह जेवण करतात.