राष्ट्रवादीत अखेर महापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत मंगळवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत तसा निर्णय झाल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. येत्या दोनतीन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, नव्या महापौरपदासाठी अभिषेक कळमकर यांचे नाव आघाडीवर आहे.
कमालीची गोपनीयता पाळून मंगळवारी मुंबईत याबाबत बैठक बोलावण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वीच ती ठरली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. नगरहून आमदार अरुण जगताप, महापौर तशा आमदार संग्राम जगताप, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, डॉ. रावसाहेब अनभुले, लक्ष्मणराव वाडेकर असे मोजकेच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
संग्राम जगताप हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर महापौर व आमदार अशी दोनही पदे त्यांच्याकडेच आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच यातील एक पद म्हणजेच महापौरपद त्यांनी सोडावे, अशा हालचाली पक्षात सुरू होत्या. मात्र जगताप यांनी सुरुवातीला हा विषय लांबणीवर टाकण्यात यश मिळवले होते. महापौरपदाचा कार्यकाळही ते पूर्ण करतील, अशी चर्चा सुरू असतानाच पक्षात या बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी झालेल्या बैठकीत या बदलाला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला. जगताप पिता-पुत्रांना विश्वासात घेऊनच तशी चर्चाही झाली. नव्या निवडीच्या दृष्टीने कळमकर यांचे पुतणे अभिषेक कळमकर यांचे नाव आघाडीवर असून येत्या दोनतीन दिवसांत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर संग्राम जगताप महापौरपदाचा राजीनामा देतील, असे रात्री उशिरा समजले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा