वेंगुर्ले नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्याचा फायदा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी घेऊन एका गटाला साथ दिली. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीत मित्रपक्षात तणाव निर्माण झाला आहे. वेंगुर्ले नगराध्यक्षपदी डॉ. पूजा कर्पे व उपनगराध्यक्षपदी वामन कांबळे यांची निवड होताच आपण राष्ट्रवादीचेच असल्याचे सांगितले, पण सर्वानी काँग्रेस नेते नारायण राणे यांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांना इशारा दिला. राष्ट्रवादीचा व्हीप झुगारून सात नगरसेवकांनी पक्षात फूट पाडली.
वेंगुर्ले नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दंगल उसळली होती. ही दंगल काँग्रेस नेते नारायण राणे यांचे सुपुत्र स्वाभिमानी संघटना अध्यक्ष नीतेश राणे यांनी घडविल्याचा आरोप करीत काँग्रेसला सार्वत्रिक निवडणुकीत एक तर राष्ट्रवादी १२, भाजप २ व मनसे १ जागेवर वर्चस्व होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ व १ अपक्ष मिळून १३ जणांचे बलाबल असताना विद्यमान नगराध्यक्षांचा राजीनामा आमदार दीपक केसरकर यांनी ठरल्याप्रमाणे घेतला, त्यामुळे निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीने अन्नपूर्णा नार्वेकर तर दुसऱ्या गटाने डॉ. पूजा कर्पे उमेदवार दिले होते.
राष्ट्रवादीत सरळसरळ दोन गट पडले. त्यातील डॉ. पूजा कर्पे व वामन कांबळे गटाला काँग्रेसने साथ दिली. काँग्रेसची साथ असल्याचे लक्षात येताच आमदार केसरकर यांनी पक्षाचा व्हीप जाहीर केला तर राष्ट्रवादीचे नगरपालिका गटनेते वामन कांबळे यांनी स्वतंत्र व्हीप जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादीची नगरपालिकेतील गटबाजी चव्हाटय़ावर आली.
या गटबाजीत सात नगरसेवकांनी डॉ. पूजा कर्पे नगराध्यक्ष व वामन कांबळे यांना उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले. त्यांना मनसेच्या एका नगरसेवकाने पाठिंबा दिला. भाजपचे दोन नगरसेवक तटस्थ राहिले तर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसे व भाजप दोन मिळून तीन नगरसेवक तटस्थ राहिले.
नगराध्यक्ष डॉ. पूजा कर्पे यांना ९ मते तर अन्नपूर्णा नार्वेकर यांना ६ मते मिळाली व उपनगराध्यक्ष वामन कांबळे यांना ८ तर प्रसन्ना कुबल यांना ६ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष बनल्या.
आमदार दीपक केसरकर यांच्या कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीचा एक गट निर्माण झाला. त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे पालकमंत्री नारायण राणे यांनी सांगून त्यांचे स्वागत केले. पुत्र नीतेश राणे याच्यामुळे हे शक्य झाल्याचे राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमदार दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले की, ज्या राणे यांच्यामुळे वेंगुर्लेत दंगल घडली त्यांना लोकांनी नाकारले. त्यांनीच मागच्या दरवाजाने आज प्रवेश केला हे हास्यास्पद आहे.
सिंधुदुर्गची लोकशाही संपविण्याचा राणे यांचा हा डाव जनतेच्या विश्वासावर मी हाणून पाडेन, असे आमदार केसरकर म्हणाले. राणे यांनी विजयी उमेदवारांना विकत घेऊन लोकशाही संपविण्याची अशीच वाटचाल सुरू ठेवल्यास मला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या विरोधात मैदानात उतरावे लागेल, असा इशारा दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा