वाई: महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेण्णालेक भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागलं आहे. यामुळे महाबळेश्वर पाचगणीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील काही दिवसांपासून महाबळेश्वरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे महाबळेश्वर-पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव तुडूंब भरला आहे.
शनिवारी पहाटेपासून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. महाबळेश्वर शहर व परिसरात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १३५५.४० मिमी (५३ इंच )पावसाची नोंद झाली. तर मागील २४ तासात १५० मिमी (१५ इंच) पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात जुलै महिन्याच्या प्रारंभीपासूनच पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
हेही वाचा- महाबळेश्वरमध्ये वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयची छापेमारी, कोट्यवधींच्या वस्तू जप्त
मागील आठ ते दहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर – पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला. वेण्णालेक मधून महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.