वाई महाबळेश्वर येथे सुरु असणाऱ्या संततधार पावसाने शनिवारी पहाटे वेण्णा लेक तलाव पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी नागरीकांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहर व परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. जून महिन्यामध्ये एकूण तीस इंच तर आज अखेर ५१.२२० इंच (१३०१मिमी) पावसाची नोंद झाली आहे.
आता जुलै महिन्यात जोरदार वाऱ्यासह दाट धुके व पावसाची संततधार सुरु आहे. येथे सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर – पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला. महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. वेण्णालेक परिसरांत पर्यटकांनी अशा धुंद वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी गर्दी केली आहे. अनेक जण दाट धुक्यात सेल्फी घेताना पहावयास मिळत आहेत.