जनलोकपाल विधेयकासाठी राळेगणसिद्धीमध्ये बेमुदत उपोषणाला बसलेले अण्णा हजारे यांचे आंदोलन रोज वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत येते आहे. गुरुवारी आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास यांना राळेगणमध्ये धक्काबुक्की झाली. शुक्रवारी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह आणि आम आदमीचे गोपाल राय यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यात अण्णांनी स्वतः हस्तक्षेप करून गोपाल राय यांना खडे बोल सुनवावे लागले. यानंतर गोपाल राय यांनी अण्णांना पत्र लिहून राळेगणमधून काढता पाय घेतला.
राळेगणमध्ये शुक्रवारी सिंह भाषण करीत असताना त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोऱणांविरोधात एकजुटीने लढण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. वेगवेगळे गट बनवून लढले, तर उपयोग होणार नाही, असे त्यांनी सांगितल्यावर गोपाल राय यांनी त्यांना प्रतिवाद करण्यास सुरुवात केली. यावेळी सिंह आणि राय यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. उपस्थितांसमोरच दोघांमध्ये वाद-प्रतिवाद होत असल्याचे बघितल्यावर अण्णांनी त्यात हस्तक्षेप करून गोपाल राय यांना खडे बोल सुनावले.
सिंह बोलत असताना तुम्ही मधे का बोलता आहात. त्यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करू द्या. तुम्हाला मी कालच उपोषणाला बसू नका, म्हणून सांगितले होते. तुम्हाला जर दंगा घालायचा असेल, तर गावाबाहेर जाऊन घाला. दुसऱयाचे भाषण सुरू असताना मधे बोलू नका, या शब्दांत अण्णांनी राय यांना ठणकावले. यानंतर गोपाल राय यांनी अण्णांना पत्र लिहिले. जनलोकपाल विधेयक मंजूर होत नाही, तोपर्यंत अण्णांच्यासोबत मी देखील उपोषण करणार आहे. तुम्ही राळेगण सोडून जाण्यास सांगितल्यामुळे मी इथून जात आहे. मात्र, तुमच्यासोबत माझेही उपोषण सुरूच राहील, असे त्यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.
दरम्यान, अण्णांच्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दर्शविला आहे. मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर शुक्रवारी राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा