अमरावतीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. यानंतर आता भाजपा नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यात अनिल बोंडे लाठीचार्ड केल्यावरून पोलिसांना जाब विचारताना दिसत आहेत. तसेच पोलिसांनी काय तमाशा लावला आहे, तुमचे हे धंदे बंद करा, असं बोलताना या व्हिडीओत दिसत आहे. अनिल बोंडे यांनी स्वतः हा व्हिडीओ रिट्वीट केलाय.

माजी कृषी मंत्री अनिल बोंडे पोलिसांना म्हणाले, “तुमचे हे धंदे बंद करा. तुम्ही हा काय तमाशा लावला आहे. सगळेजण शांततेत होते, तुम्ही काय तमाशा लावला आहे. कुठे गेले तुमचे पोलीस आयुक्त?”

यावेळी बोंडे यांनी घटनास्थळावर उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्यांना काय मॅडम काय लावलं आहे हे लोकं शांत होते ना असं म्हटलं. यावर महिला पोलीस अधिकाऱ्यानं जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्याचं सांगितलं. यावर बोंडे यांनी त्यांनी तलवारी काढल्या त्याचं काय असा प्रश्न विचारला. तसेच आम्ही पोलिसांवर दगडफेक केली नसून पोलीसच दमदाटी करत असल्याचा आरोप केला.

“आम्हाला शहाणपण शिकवता, काल कुठं गेले होते?”

यावेळी उपस्थित जमावातून भाजपाचे कार्यकर्ते अनिल बोंडे यांच्याकडे पोलिसांची तक्रार करतानाही दिसत आहे. तसेच एकजण त्यांना काल कुठे गेले होते हे विचारण्यास सांगतो. यावर अनिल बोंडे पोलिसांना म्हणाले, “आम्हाला शहाणपण शिकवता, काल कुठं गेले होते?” यावेळी जमावाने जय श्रीरामची घोषणाबाजी देखील केली.

हेही वाचा : … म्हणून हिंदू- मुस्लिमांमध्ये भांडणं लावण्याचं काम सुरू : छगन भुजबळ

अनिल बोंडे यांनी एक ट्वीट करत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं ट्वीट केलं. यात ते म्हणाले, “आज (१४ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजल्यापासूनच शेकडो पोलिसांनी माझ्या घराला घेराव केला. सकाळी १० वाजता मला ताब्यात घेण्यात आले. माझ्या घरासमोर एवढं पोलीस बळ वापरणे योग्य नाही. जेथे आज सुद्धा तणाव निर्माण होऊ शकते तिथे पोलिसांनी जावे आणि नागरिकांचा समाजकंटाकापासून बचाव करावा.”

Story img Loader