शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप औरंगाबादमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय केणेकर यांनी बुधवारी केला.
नववर्षाच्या स्वागतासाठी औरंगाबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री आयोजित केलेल्या पार्टीमध्ये खैरे आणि केणेकर यांच्यात वादावादी झाल्याचे केणेकर यांचे म्हणणे आहे. मात्र, खैरे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, पार्टीमध्ये कोणी महिलेला डान्स करण्यासाठी बळजबरी करीत असेल, तर शिवसैनिक कसा शांत बसेल, एवढीच मोघम प्रतिक्रिया खैरे यांनी दिली आहे.
केणेकर यांनी याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली नाही. औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर भाजपने बहिष्कार टाकला होता. संजय केणेकर यांच्याच नेतृत्त्वाखाली हा बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यानंतर रात्री या दोन्ही नेत्यांमध्ये वादावादी झाल्याचे समजल्यावर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.