घराणेशाही, एकवटलेले विरोधक, राष्ट्रवादीची छुपी ताकद आणि मोदींच्या सभेनंतर मतदारसंघात तयार झालेली मोठी लाट या साऱ्यांचा परिणामी सांगलीचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळला आणि भाजपच्या संजयकाका पाटील यांनी काँग्रेसची गेल्या तीन पिढय़ांची घराणेशाही मोडीत काढत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद असतानाही जिल्ह्य़ाला विकासाच्या कामासाठी फारसा लाभ झाला नाही. संपर्काचा अभाव, चौकडीच्या भूलथापांमुळे काँग्रेसचे उमेदवार अखेपर्यंत कोशातच राहिले. विरोधकांनी निष्क्रियतेचा केलेला आरोप जनतेनेही ग्राह्य़ मानला. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम पुण्यात पुत्रप्रेमापोटी अडकले. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील राजू शेट्टींना रोखण्यासाठी हातकणंगल्यात गुंतले. राहता राहिले गृहमंत्री आर. आर. पाटील. आर. आर. यांच्या आवाहनाला सामान्य मतदारांनी धुडकावले. त्यांच्या मतदार संघातही भाजपला ३८ हजारांचे मताधिक्य मिळाले.भाजपाची व्यूहरचना विजयास कारणीभूत ठरली.