* पाण्याची मागणी वाढली, जलसाठे घटले 
*  चंद्रपूरकरांची अक्षरश: होरपळ
* अभूतपूर्व जलसंकटाचे संकेत
मे महिना सुरू झाला असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्य़ांचे तापमान ४२ अंश सेल्सियसच्या वर गेल्याने यंदा उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा अतिशय असह्य़ राहील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. विदर्भात यंदा उष्णतेची अभूतपूर्व लाट आली असून सर्वाधिक होरपळ चंद्रपूरकरांची होत आहे. ओपन कास्ट खाणी आणि वीज प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्य़ाचे तापमान नेहमीच ४० अंशापेक्षा जास्त असते. यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात उन्हाने खरे रंग दाखवणे सुरू केले आणि चंद्रपूरचा पारा गेल्या आठवडय़ात ४७.३ अंशांपर्यंत पोहोचला. चालू महिन्यात तो ४८ अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्य़ातील थंड हवेचे ठिकाण समजले जाणारे चिखलदराही यंदा चांगलेच तापले असून तेथील पारा ४१ अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे यावर्षीच्या मान्सूनपर्यंत विदर्भात उन्हं चांगलेच तापणार असे भाकीत हवामानतज्ज्ञांनी केले आहे.
‘ग्लोबल वार्मिग’ने जगाचे तापमान वाढत असल्याचा इशारा दिला असून त्याची झलक विदर्भवासी अनुभवू लागले आहेत. प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड यासाठी कारणीभूत ठरली आहे. निसर्गाने दिलेली अमूल्य वनसंपत्ती वसाहतींसाठी तोडली जात असल्याने पृथ्वीला थंडाव्यासाठी आवश्यक असलेली वनराजी आता झपाटय़ाने कमी होऊ लागली आहे.
महाराष्ट्राच्या एकूण २३ टक्के जंगलक्षेत्रफळापैकी १६ टक्के जंगल विदर्भात असूनही विदर्भाला सूर्यदेवाच्या कोपाचा सामना करावा लागतो. हा संपूर्ण पट्टा ‘उन्हाळी होरपळ’ म्हणून ओळखला जात असून अनेक पर्यटकांनीही उन्हाळ्याच्या सुट्टीत विदर्भात येण्याचे बेत रद्द केले आहेत. ताडोबाच्या जंगलात मोठय़ा संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या छातीत तर पाऱ्याची तीव्रता पाहूनच धडकी भरू लागली आहे.
उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर पाण्याची मागणी अचानक वाढली आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही वाढले असल्याने यामुळे मे आणि जून महिन्यात विदर्भावरही जलसंकट ओढवण्याची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भ आठवडाभरापासून अक्षरश: भाजून निघत आहे. अनेक जिल्ह्य़ांना भारनिमयमन आणि पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून वन्यजीवांच्या जीवाची काहिली होत असल्याने मानव-वन्यप्राणी संघर्षांची तीव्रताही यंदा अचानक वाढली आहे.
चंद्रपूर, नागपूर, वर्धा, ब्रम्हपुरी, यवतमाळ, गोंदिया, वाशीम आणि बुलढाण्याच्या तापमानाने ४२ अंशाचा आकडा पार केला. एरवी बुलढाण्यात उन्हाळ्यातही फारसे तापत नाही परंतु, यंदाचे वर्ष कठीण जाईल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.
सर्वाधिक तडाखा बुलढाण्याला
पाणीटंचाईचा सर्वाधिक तडाखा विदर्भात बुलढाणा जिल्ह्य़ाला बसला आहे. महिनाभरातून एकदा नळ येत असल्याने पाण्याचा साठा कसा करून ठेवावा, याची चिंता नागरिकांना लागली आहे. पुढील ४८ तासात विदर्भात कमाल तापमान ४५ आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला आहे.
जलसाठय़ांमधील जलस्तर झपाटय़ाने कमी होत चालल्याने येणारा दोन महिन्यांचा काळ कसोटीचा राहणार आहे. पाण्याचे महत्त्व समजूनही न उमजणाऱ्यांनी आता पाणी बचतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन विविध पातळ्यांवरून केले जात आहे. महापालिका, नगर पालिकांनाही पाणीटंचाईची चाहूल लागल्याने पाणी जपून वापरण्याच्या सूचना नागरिकांना वारंवार दिल्या जात आहेत. नागपूर विभागातील मोठय़ा जलसाठय़ांपैकी गोसीखुर्द, तोतलाडोह, कामठी खैरी, पेंच रामटेक  लोवर नांद, वडगाव २६ टक्के, इटियाडोह, निम्न वर्धा प्रकल्प आता खोल गेले असून मध्यम प्रकल्पांमध्ये अवघे ३१ टक्के पाणी पाणी उरले आहे.