ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली असून त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगभूमीवरील ‘बंडखोर’अभिनेत्री’ म्हणून त्या ओळखल्या जायच्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लालन सारंग यांचा २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात जन्म झाला होता. लालन सारंग या माहेरच्या पैंगणकर. एक भाऊ, सहा बहिणी आणि आई व वडील असे त्यांचे मध्यमवर्गीय कुटुंब होते. घरातील कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हते. त्या गिरगावातील ‘राममोहन’ शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच दुसरीकडे त्या खासगी कंपनीत नोकरी देखील करत होत्या. त्यांनी काही काळ मुंबईत कामगार आयुक्त कार्यालयातही नोकरी केली होती. ‘आयएनटी’च्या स्पर्धेत महाविद्यालयाने सादर केलेल्या एका नाटकात त्यांनी काम केले आणि तिथूनच त्या नाट्यक्षेत्राकडे वळल्या.

महाविद्यालयात नाटकात काम करताना त्यांची कमलाकर सारंग यांच्याशी ओळख झाली. पुढे जाऊन त्यांनी कमलाकर सारंग यांच्याशी प्रेमविवाह केला. नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भुमिकांमधून केवळ मनोरंजन न करता त्यामधून सामाजिक संदेश देण्यावर लालन सारंग यांनी भर दिला. कमला, सखाराम बाईंडर, गिधाडे, रथचक्र या नाटकांतील त्यांच्या भुमिका विशेष करुन गाजल्या. त्या एक बंडखोर अभिनेत्री म्हणुन सुपरिचीत होत्या.

सारंग यांच्या गाजलेल्या कलाकृती
> आक्रोश (वनिता)
> आरोप (मोहिनी)
> उद्याचा संसार
> उंबरठ्यावर माप ठेविले
> कमला (सरिता)
> कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय)
> खोल खोल पाणी (चंद्राक्का)
> गिधाडे (माणिक)
> घरकुल
> घरटे अमुचे छान (विमल)
> चमकला ध्रुवाचा तारा
> जंगली कबुतर (गुल)
> जोडीदार (शरयू)
> तो मी नव्हेच
> धंदेवाईक (चंदा)
> बिबी करी सलाम
> बेबी (अचला)
> मी मंत्री झालो
> रथचक्र ( ती)
> राणीचा बाग
> लग्नाची बेडी
> सखाराम बाइंडर (चंपा)
> संभूसांच्या चाळीत
> सहज जिंकी मना (मुक्ता)
> सूर्यास्त (जनाई)
> स्टील फ्रेम (हिंदी)

पुरस्कार आणि सन्मान
> लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्काराने सन्मानित
> पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
> २००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
> अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (२४ जानेवारी, २०१७)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran marathi actress lalan sarang passed away in pune at age of