बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध केल्याबद्दल माझ्यावर साहित्यिकांनी घणाघाती टीका केली. खरे बोलणे गुन्हा असेल, तर फुले-आंबेडकरही दहशतवादी होते का? असा सवाल ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी मंगळवारी केला. दाभोलकर, पानसरेंपाठोपाठ कलबुर्गी यांची झालेली हत्या हे सरकार दिवाळखोरीत निघाल्याचे द्योतक आहे. हे तालिबानी राज्य असून, सरकार कशासाठी? अशी विचारणाही त्यांनी केली. मला दहशतवादी म्हणणारे भित्रे असल्याची खरमरीत टीका नाव न घेता विश्वास पाटील यांच्यावर त्यांनी केली.
‘‘राष्ट्रद्रोही म्हणून इंग्रजांनी फासावर लटकवलेले अनेक क्रांतिकारक मुस्लीम होते. सुभाषचंद्र बोस यांचा सर्वात जवळचा साथीदार शहानवाज खान हा होता. पंजाबमध्ये फाशी देण्यात आलेले सर्वात जास्त क्रांतिकारक मुस्लीम होते. केवळ काल्पनिक शिवाजी रंगवून चालत नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी व्यक्तिगत नव्हे, तर तात्त्विक विरोध होता. कारण, त्यांनी हिंदू-मुस्लीम तेढ वाढेल असा चुकीचा इतिहास लोकांसमोर सादर केला,’’ अशी टीका नेमाडे यांनी केली. साहित्य अकादमी आणि इतर संस्थांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या देशीवादावरील राष्ट्रीय चर्चासत्रासाठी नागपुरात आले असताना नेमाडे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांचा इतिहास असो की रस्त्यांना नाव देणे असो, सतत मुस्लीमद्वेष पसरवून देशाच्या दुसऱ्या फाळणीचा घाट घातला जात आहे.
औरंगाबाद हे नाव बदलण्यासंबंधीचा प्रश्न विचारल्यावर नेमाडे उसळून म्हणाले, ‘‘जुना इतिहास बदलता कशाला? बदलच करायचा असेल तर लोकांना स्वच्छ, शुद्ध पाणी द्या. मुसलमानांमुळे या देशाचे वाटोळे झाले, शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते, असा बनाव निर्माण करून सतत मुस्लिमांविरोधी गरळ ओकली जाते. महाराजांच्या जवळच्या माणसांमध्ये मुस्लीम सरदार मोठय़ा संख्येने होते. शहाजी राजे व शिवाजी महाराजांना घडवण्यात मलिक अंबरचा सिंहाचा वाटा आहे. सतीची चाल सगळ्यात प्रथम औरंगजेबाने बंद केली आणि तसे करणाऱ्याला हातपाय तोडण्याची जाचक शिक्षा दिल्याने बंगालचे लोक औरंगजेबाच्या विरोधात गेले. शिवाजी महाराज मुस्लिमांपेक्षा मोरे, शिर्के, शिंदे यांच्यासारख्या मराठा वतनदारांशी जास्त लढले.’’
प्राध्यापक केवळ बकवास करतात..
मातृभाषेतून ज्ञान मिळते, तर परकीय भाषेतून माहिती मिळते. ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी मातृभाषेतून पुस्तके हवीतच. मात्र एकेक लाख पगार घेणारे प्राध्यापक कोणतेही शास्त्रीय ग्रंथ निर्माण करीत नाहीत. एम.ए., एम.एस्सी., पीएच.डी. असलेले प्राध्यापक केवळ बकवास करीत असतात. त्यांना पाच रुपये पगारही देऊ नये. मराठीतून एक तरी पुस्तक प्रकाशित करा, असा नियम त्यांच्यासाठी केला पाहिजे, अशा शब्दांत नेमाडे यांनी प्राध्यापकांना फटकारले.