रत्नागिरी : मराठी पुस्तके आणि नियतकालिकांच्या मुखपृष्ठ रेखाटनांचे सुमारे सहा दशके काम करून स्वत:ची वेगळी शैली निर्माण केलेले ज्येष्ठ चित्रकार भालचंद्र शिवराम ऊर्फ बाळ ठाकूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.  त्यांच्या पश्चात दोन पुत्र आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकूर यांचा जन्म २४ एप्रिल १९३० रोजी लांजा तालुक्यातील भांबेड येथे झाला. मुंबईच्या सर जे.जे स्कूल ऑफ आर्टमधून १९४८ मध्ये त्यांनी पदविका प्राप्त केली. ‘जे. वॉल्टर थॉम्प्सन’, ‘अय्यर्स’, ‘उल्का’ अशा जाहिरात संस्थांत त्यांनी काही काळ नोकरी केली. १९५० नंतर  ठाकूर मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे, मांडणी आणि संकल्पनांचे काम करू लागले. रेषेवर प्रभुत्व असल्यामुळे रेखाटने करण्याबरोबरच जलरंग वापरूनही त्यांनी चित्रे रेखाटली. साहित्याची उत्तम जाण असल्याने संबंधित लेखनाला अतिशय अनुरूप रेखाटने करण्यासाठी ते नावाजले गेले. ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘ललित’ यांसारख्या मराठी साहित्य विश्वातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नियतकालिकांसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्याचप्रमाणे लक्ष्मीबाई टिळकांपासून बालकवी, मर्ढेकर, बा.भ. बोरकरांपर्यंत अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रे त्यांनी रेखाटलेली आहेत. प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांचे ‘आत्मकथा’, ‘प्रतिबिंब’, याशिवाय ‘गणूराया’ आणि ‘चानी’ तसेच कै. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबऱ्यांचीही मुखपृष्ठेही  बाळ  ठाकूर यांच्या कल्पनेतून साकारलेली आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran painter bal thakur passes away zws