इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑप. सोसायटी या संस्थेचे उपाध्यक्ष व शहर काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष उल्हास माधवराव पाटील (वय ६०) यांचे सोमवारी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाने आजारी होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.     
पाटील हे मूळचे कोल्हापुरातील. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी इचलकरंजी गाठली होती. यंत्रमाग व मेडिकल स्टोअर्स या व्यवसायात त्यांनी नाव कमाविले होते. कोल्हापूर रस्ता परिसर भागात ते सामाजिक कार्यात आघाडीवर असत. याच भागातून ते दोन वेळा नगरपालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाले होते. काँग्रेस पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. निवडणूक काळात तांत्रिक आघाडीवरील सोपस्कार पार पाडण्यात त्यांचा हातखंडा होता. ते उत्तम वक्ते म्हणून ओळखले जात होते. इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिलचे ते संचालक होते. मुख्यमंत्री चव्हाण यांचे कराड येथील निकटवर्तीय आनंदराव पाटील यांचे ते व्याही होते.