छत्रपती संभाजीनगर : दि.६ : प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल यांचे गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन झाले. घृष्णेश्वरचे दर्शन व अभिषेक, क्रांती चौकात महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाल्यानंतर दुपारी कौशल यांनी महात्मा गांधी मिशन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विकी कौशल यांनी, मी मुंबईचा असलो तरी मला उत्तम मराठी बोलता येते. प्रथमच संभाजीनगरमध्ये आलो आहे, असे संवादादरम्यान सांगितले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठात कौशल यांचे आगमन झाल्यानंतर उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. रुक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, एमजीएम परिवारातील सर्व सदस्य, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.