पाटण तालुक्यातील करपेवाडीमध्ये गेल्या साडेतीन वर्षापूर्वी भाग्यश्री संतोष माने या महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून झालेला खून हा अंधश्रद्धेचा बळी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार अंधश्रद्धेतून गुप्तधनाच्या अमिषापोटी निष्पाप भाग्यश्रीचा नरबळी तिच्या आजीकडूनच दिला गेल्याची दुर्दैवी घटना २२ जानेवारी २०१९ रोजी घडली होती. पोलिसांनी या गुन्ह्यात दोघा मांत्रिकासह चौघांना अटक केली असून, त्यांना आज बुधवारी घटनास्थळी आणण्यात आले होते.

विकास राठोड (वय ३५) व फुलसिंग राठोड (वय ४८, दोघेही रा. कर्नाटक) तसेच रंजना साळुंखे (वय ५८, रा. करपेवाडी, ता. पाटण), कमल महापुरे (वय ५०, रा. खळे, ता. पाटण) अशी पोलिसांनी या प्रकरणी हातकड्या ठोकलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात आणखी काहींचा समावेश असल्याचे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अलीकडेच सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ९ जणांचा अंधश्रद्धेतून बळी गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. यातील आब्बास बागवान (रा. सोलापूर) याच्या संपर्कात करपेवाडीतील या गुन्ह्यातील काहींचा संपर्क असल्याची माहिती तांत्रिक तपासात उघड झाली. आणि हाच धागा पकडून करपेवाडीतील भाग्यश्री माने हिच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. हा गुन्हा ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने उघडकीस आणला आहे. त्यांचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Story img Loader