बीडमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचे आमदार सुरेश धस यांनी धाडस केले. तथापि, त्यांना बळीचा बकरा बनविण्यात आला. उमेदवार कोणीही आला तरी फरक पडणार नाही, असे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. धस यांच्यापेक्षा प्रकाश सोळंके किंवा अमरसिंह पंडित उमेदवार असते तर लढत मोठी झाली असती, असे सांगत राष्ट्रवादीत काही माझे जुने स्नेही आहेत, ते सहकार्य करतील, असेही मुंडे म्हणाले.
राहुल गांधी यांचा बुधवारी (दि. ५) औरंगाबादला दौरा होणार आहे. या पाश्र्वभूमीवर मुंडे म्हणाले की, राहुल गांधी यांचा मराठवाडय़ात प्रवेश म्हणजे आमच्यासाठी शुभसंदेश. ते जेथे जातात, तेथे काँग्रेसचा पराभव होतो. अजित पवारांवरही मुंडे यांनी या वेळी टीका केली. अजित पवार कौरवांचीच भाषा बोलतात. ते दुर्योधनासारखे आहेत. राष्ट्रवादीला निवडणूक जिंकायची असेल तर पवारांनी त्यांना बारामतीबाहेर पाठवू नये. कारण त्यांची जीभ वारंवार घसरते. फार तर त्यांच्या जिभेचा इलाज करून घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘शुक्रवारी संपुआविरुद्ध चार्जशीट’
शुक्रवारी (दि. ७) केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विरोधातील चार्जशीटही मांडणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, पूवरेत्तर राज्यांच्या विकासाकडे या सरकारने अजिबात लक्ष दिले नाही. विशेषत: देशाच्या सीमादेखील सुरक्षित ठेवल्या नाहीत. तारेचे कुंपण करणेही त्यांना जमले नाही. आरोपपत्रात यांसह अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा