सांगली म्हणजे आमची पारंपरिक मक्तेदारी समजणा-या काँग्रेसला प्रतीक पाटील यांच्या पराभवाने अनपेक्षित धक्का देणा-या भारतीय जनता पक्षाने संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून एका दगडात दोन मातब्बर नेत्यांचा वेध घेतला आहे. याच बरोबरच महायुतीच्या माध्यमातून हातकणंगले मतदारसंघातील राजू शेट्टी यांच्या विजयात सहभागी होऊन इस्लामपुरातही जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न झाला आहे. तोंडावर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ८ ही मतदारसंघांत महायुतीला मिळालेले मताधिक्य प्रस्थापितांना धोक्याची घंटा वाजविणारे ठरले तर नवल नाही.
सांगलीत झालेला भाजपचा विजय हा केवळ पक्षाचा अथवा संजयकाकांचा नसून, या मागील खरे कारण काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीवरील असलेल्या लोकांचा रोष हेच असल्याचे मतयंत्रणेवरील मतदानातून पुढे आले आहे. लोकसभेच्या विजयासाठी भाजपने सांगलीतील वारसा हक्काच्या मुद्यावर प्रचाराची भिस्त ठेवत असताना आघाडीच्या निष्क्रियतेचा लाभ उठवला. राज्याचे नेतृत्व करणा-या वसंतदादा पाटील यांचा नातू म्हणून काँग्रेसची उमेदवारी जशी प्रतीक पाटील यांनी गृहीतच धरली. तसाच मतदारसंघही गृहीत धरून सामान्य मतदार घराणेशाहीला बांधील असल्याचा वृथा अभिमान बाळगला. आजूबाजूला असणारी चौकडी सांगेल तेच खरे असे म्हणत दिवास्वप्ने पाहण्यात मश्गूल राहिले. दुष्काळी भागातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा फारसा लाभ देता आला नाही.
राहुल ब्रिगेडमध्ये असणा-या प्रतीक पाटील यांनी सांगलीच्या विकासासाठी कोटय़वधी रुपयांची विकासकामे केल्याचा डांगोरा अखेरच्या टप्प्यात पिटण्यास सुरुवात केली होती. तोपर्यंत विरोधकांनी त्यांची निष्क्रियता गावोगावच्या चव्हाटय़ावर हिरिरीने मांडली. अगोदरच महागाईने पिचलेला, दुष्काळाने होरपळलेला, ऊसदराने भाजलेला सामान्य मतदार समर्थ पर्यायाच्या शोधात होता. भाजपने संजय पाटील यांच्या रूपाने हा पर्याय उपलब्ध करून दिला.
काँग्रेसबद्दल असणारी नाराजी संघटित करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले असलेतरी स्थानिक पातळीवर महायुतीत सारे काही आलबेल होते असे नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना वगळता अन्य घटकपक्षांचा भाजपच्या विजयात फार मोठा सहभाग होता असे म्हणणे धाडसाचे ठरेल. खुद्द भाजपमध्ये विद्यमान आमदार संभाजी पवार यांनी वेगळा सूरआळवत विजयरथाला गुणा लावण्याचा प्रयत्न केला. तर जतचे आमदार प्रकाश शेंडगे व्यासपीठावरून नेत्यांबरोबरच प्रचार सभेत आणि रात्रीच्या अंधारात काँग्रेसच्या सोबतीला अशी दुटप्पी भूमिका घेत होते. मात्र सर्वश्रेष्ठ असणा-या सामान्य मतदारांनी नेत्यांचे अंदाज धुळीला मिळवत नरेंद्र मोदी यांच्या कमळाला साथ दिली. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका-यांनी मानसन्मानासाठी तटस्थतेची भूमिका घेतल्याने विजयाचे शिल्पकार बनण्याचा आनंद जसा गमावला. तसाच गुलालही.
एकीकडे भाजपमध्ये असणारी बेदिली चव्हाटय़ावर येण्यापासून रोखण्यात महायुतीचे नेते यशस्वी ठरले. मात्र आघाडीतील धर्म पाळण्याच्या वल्गणा केवळ व्यासपीठापुरत्याच मर्यादित राहिल्या. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही निवडणूक केवळ संजयकाका आहेत म्हणून प्रतिष्ठेची केली. अन्यथा राष्ट्रवादीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ओठात एक, पोटात एक हीच भूमिका निभावली. आघाडीतील समन्वयाचा अभाव काँग्रेसला मारक ठरला. दुस-या बाजूला पुण्यातील काँग्रेसची उमेदवारी डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना मिळाल्याने त्यांची ताकद प्रतीक पाटील यांच्या पाठीशी राहू शकली नाही. सर्वच विधानसभा मतदारसंघांत नेते एकीकडे, कार्यकत्रे दुसरीकडे अशी अवस्था झाल्याने भाजपला काँग्रेसचा पराभव करणे सहज साध्य होऊ शकले.
इस्लामपूर व शिराळा या दोन तालुक्यांतून महायुतीचे राजू शेट्टी यांना लोकांनी भरभरून मतांची साथ दिली. सांगलीवरील वसंतदादा घराण्याचे नेतृत्व संपविण्यासाठी प्रयत्न करणा-या जयंत पाटील यांना राजू शेट्टी यांनी इस्लामपुरात रोखले. लोकसभेसाठी २००९चा प्रयोग या वेळी यशस्वी झाला असला तरी येणा-या विधानसभा निवडणुकीत राजकीय फेरमांडणी करीत असताना मोठी किंमत आघाडीला मोजावी लागली तर नवल वाटणार नाही.
सांगलीचा विजय प्रस्थापितांसाठी धोक्याची घंटा
तोंडावर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ८ ही मतदारसंघांत महायुतीला मिळालेले मताधिक्य प्रस्थापितांना धोक्याची घंटा वाजविणारे ठरले तर नवल नाही.
First published on: 18-05-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victory of sangli is warning bell for front