रवींद्र जुनारकर

आयटीसी, बांबू विकास मंडळ आणि बीआरटीसीच्या माध्यमातून  प्रकल्प

औद्योगिक व वनाने समृद्ध जिल्हय़ातील आदिवासी व ग्रामस्थांना रोजगार मिळावा, या हेतूने अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आंतरराष्ट्रीय कंपनीचा अगरबत्ती प्रकल्प पोंभूर्णा येथे सुरू करत आहेत. आयटीसी अगरबत्ती प्रकल्प, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि बांबू  संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प येथे उभा राहत आहे. यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वैद्यकीय, कायदा, वाणिज्य तथा विविध विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले युवक रोजगारासाठी भटकंती करत आहेत. मात्र त्यांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत स्वयंरोजगार, महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार, लघुउद्योग किंवा एखाद्या शासकीय योजनेचे नियोजन करून त्या माध्यमातून स्वयंरोजगाराकडे तरुणांनी वळावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून महिला व युवकांना रोजगाराचे दालन उघडे करून दिले आहे. या जिल्हय़ातील जनतेचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांना रोजगार देण्याचा मानस  मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता. चंद्रपूर जिल्हा रोजगारयुक्त जिल्हा म्हणून नावलौकिकास यावा, यासाठी चंद्रपूरमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात लघुउद्योगाला चालना दिली जात आहे.

चंद्रपूर जिल्हय़ात बांबूपासून अगरबत्ती निर्मितीसाठी  मंगलदीपक या विविध सुगंधी अगरबत्ती ब्रॅन्डच्या व्यवसायातील नामांकित आयटीसी कंपनीसोबत करार केला. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता १०० मे.टन असून चांदा ते बांदा विकास योजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून  तालुक्यातील २०० हून अधिक आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी ४.८५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पात आयटीसीच्या मंगलदीप ब्रॅंन्डची अगरबत्ती तयार होणार आहे. विशेष म्हणजे, ही अगरबत्ती बांबूपासून तयार होणार आहे. टाटा कंपनी तथा टीसीएस या दोन बडय़ा कंपन्यांनी पोंभूर्णा येथे अगरबत्ती प्रकल्पासोबतच इतर अनेक छोटे उद्योग सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

जिल्ह्य़ात अनेक प्रकल्प

चंद्रपूर जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात रोजगार यावेत यासाठी चंद्रपूरमध्ये अगरबत्ती प्रकल्पासारख्या लघुउद्योगाला चालना दिली जात आहे. अगरबत्ती उद्योगासोबतच पोंभूर्णा येथे आदिवासी महिलांची कुक्कुटपालन कंपनी, टूथपिक निर्मिती केंद्र, मधुमक्षिकापालन प्रकल्प, डायमंड कटिंग सेंटर, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बांबूवर आधारित विविध वस्तूंना विक्रीसाठी विविध केंद्र त्यानंतर आता हा अतिशय आगळा वेगळा अगरबत्ती प्रकल्प होत आहे.ह्ण

‘‘आयटीसी अगरबत्ती प्रकल्प, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पोंभुर्णा येथे सुरू होणार असून यामुळे युवकांना रोजगार मिळेल.’’

– सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री

‘‘प्रकल्पाची प्रकिया सुरू झाली आहे. दोन वर्षांपूर्वी पोंभुर्णा, देवाडा, जाम तुकूम, चिंतलधाबा येथे अगरबत्तीचे छोटे युनिट सुरू करण्यात आले आहे. क्लस्टरला मंजुरी मिळताच अगरबत्तीचा मोठा प्रकल्प सुरू होईल. प्रकल्पात अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारी काडीसुद्धा बनवली जाणार आहे.’’

– राजन नेरलवार, व्यवस्थापकीय संचालक, पोंभुर्णा अगरबत्ती क्लस्टर

Story img Loader