पावसाअभावी राज्यातील संत्राबागांना धोका निर्माण झाला असून, मृगबहर फुटलाच नाही, तर आंबिया बहराची फळगळती वाढल्याने संत्री उत्पादकांसमोर संकट निर्माण झाले आहे. यंदा मान्सून लांबल्यामुळे इतर पिकांसोबतच संत्राबागांनाही फटका बसला आहे. नागपुरी संत्री नावाने ओळखल्या जाणाऱ्या संत्र्याच्या सर्वाधिक बागा अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्य़ांमध्ये आहेत.
राज्यात साधारणपणे १ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्र संत्रा फळपीक लागवडीखाली आहे. त्यापैकी ७६ हजार हेक्टर क्षेत्र एकटय़ा अमरावती जिल्ह्य़ात आहे. विदर्भातील सुमारे ६० ते ७० टक्के संत्री उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र हे मृगबहरावर अवलंबून आहे. मात्र, यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे सुमारे २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा कयास आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी मृगबहराला प्राधान्य देतात, पण यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने मृगबहर फुटलाच नाही. संत्रा फुटीसाठी पोषक वातावरण तयार न झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे. जूनमध्ये संत्र्याच्या झाडांना पुरेशा प्रमाणात पाऊस आवश्यक असतो, पण संपूर्ण महिना कोरडा गेला. त्यात जुलैचा पहिला पंधरवडा उलटला तरी सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत तीस टक्केच पाऊस झाल्याने संत्रा बागायतदारांचे नियोजन पूर्णपणे कोलमडून गेले आहे.
दुसरीकडे प्रतिकूल हवामानामुळे संत्र्याच्या आंबिया बहरालाही मोठय़ा प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. आंबिया बहरातील फळांची गळ ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधिक दिसून येते, पण जुलैमध्येच ती वाढली आहे. आता शेतकऱ्यांनी संत्राबागा वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. साधारणपणे शेतकरी एप्रिल ते जून या काळात संत्र्याच्या झाडांना ताण देतात. त्यामुळे मृगबहर चांगला येतो, असा अनुभव आहे. मृगाचा पाऊस आल्यानंतर बहर येईल, या आशेवर पावसानेच पाणी फेरले. आता झाडे जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध साधनांचा वापर करून पाणी देणे सुरू केले आहे. गेल्या वर्षी विदर्भात जुलैमध्ये सरासरीच्या २०० टक्के पाऊस झाला. अतिपावसामुळे मृगबहर गळून पडला आणि नंतर आंबिया बहराची फळगळती वाढली. यंदा मात्र उलट चित्र आहे. उष्णतामानामुळे मृगबहर आला नाही. मार्चमध्ये झालेल्या गारपिटीचाही मोठा फटका संत्राबागांना बसला.
तातडीची मदत द्या -सुरेखा ठाकरे
विदर्भातील संत्री उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांना सरकारने तातडीची मदत द्यावी, अशी मागणी अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. अपुऱ्या पावसामुळे संत्राफुटीसाठी पोषक वातावरण निर्माण न झाल्याने संत्राबागांवर अवकळा आली आहे. यासंदर्भात कृषीतज्ज्ञांमार्फत तातडीने सर्वेक्षण केले जावे आणि संत्री उत्पादकांना दिलासा देण्यात यावा, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राची संत्र्यांची उत्पादकता ही इतर संत्री उत्पादक राज्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यातच आता निसर्गानेही साथ सोडल्याने संत्री उत्पादकांसमोर संकट आहे. मृगबहर हा नैसर्गिक स्थितीवर अवलंबून आहे. झाडांना ताण दिल्यावर पाऊस अपेक्षित असतो, पण तो न आल्याने ही अवस्था झाल्याचे फळे व भाजीपाला उत्पादक विकास संघाचे अध्यक्ष कुंदन कळंबे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा