लोकसभा , विधानसभा निवडणुकांप्रमाणे यावर्षी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्या आरोप-प्रत्यारोप आणि बोगस मतपत्रिकाने गाजली. मतमोजणीनंतर नाटय़ परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याबाबत चुरस निर्माण झाली. तूर्तास दोघेही अध्यक्षपदासाठी दावा करीत आहेत. त्यात विदर्भातून निवडून आलेल्या पाच सदस्यांनी मात्र ते कुठल्याच पॅनेलचे नसल्याचे जाहीर केल्यामुळे आता त्यांची भूमिका निर्णायक राहणार असल्याचे बोलले जात आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या ३८ जागांसाठी निवडणूक पार पडली असून त्यात मुंबईमधून १६, नागपूर ५, नाशिकमधून ४, मराठवाडा २, कोकण ३ पुणे ६ आणि बेळगावमधून २ या प्रमाणे सदस्य निवडून आले. या शिवाय हौशी रंगमंच, कामगार रंगमंच संघटना,नाटय़ निर्माता संघ इत्यादी सात संघटनांतील प्रत्येकी एक या प्रमाणे सात सदस्यांसह एकूण ४५ सदस्य नियामक मंडळात राहणार आहे. हे सदस्य अध्यक्षांची निवड करतील. राज्यातील विविध भागातील मतमोजणी प्रक्रिया आटोपली असली तरी बोगस मतपत्रिकांमुळे मुंबई शाखेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती दिली होती. मतपत्रिकांची फेरतपासणी करण्यात आल्यानंतर मतमोजणी करण्यात आली. त्यात मोहन जोशी गटाचे ७, विनय आपटे गटाचे ८ आणि प्रदीप कबरे गटाचा एक या प्रमाणे उमेदवार निवडून आले. मोहन जोशी अध्यक्षपदी असताना त्यांना दोन वर्षांपूर्वी पायउतार व्हावे लागले होते. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले आणि विनय आपटे यांनी परिषदेची धुरा सांभाळली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ जागांपैकी मोहन जोशी यांनी नाशिक, मराठवाडा, कोकण, पुणे, बेळगाव आणि मुंबईमधील ७ आणि रंगमंच संघटनांचा २२ ते २५ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे तर दुसरीकडे विनय आपटे गटाची जुळवाजुळव सुरू आहे. विदर्भातून प्रमोद भुसारी, अशोक ढेरे, दिलीप देवरणकर, किशोर आयलवार आणि अ‍ॅड. पराग लुले हे पाच उमेदवार निवडून आले असून त्यांनी ते कुठल्याच पॅनेलचे नसल्याचा दावा एका कार्यक्रमात केला. पुण्यातील ६ सदस्यांपैकी दोन सदस्य जोशी आणि उर्वरित चार आपटे गटाचे असल्याची चर्चा आहे. नाशिक आणि कोकणातही अशीच परिस्थिती आहे. विदर्भाचे पाच सदस्य कोणाकडे जाणार आहेत, याबाबत अजूनही स्पष्ट झाले नसल्यामुळे मुंबईतील दोन्ही गटातील सदस्य त्यांच्याशी संपर्क करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या दोन्ही गटाची सदस्य जुळवाजुळवीचे गणित सुरू असले तरी त्यात विदर्भातून निवडून आलेल्या सदस्यांची भूमिका मात्र निर्णायक राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्या संदर्भात काही सदस्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा