ऊन-सावल्यांच्या लपंडावात पुन्हा उन्हाने बाजी मारली. दोन दिवसांपूर्वी अनुभवलेली उन्हाची काहिली गुरुवारी नागपूरकरांनी पुन्हा अनुभवली.  विदर्भात सर्वाधिक तापमान वर्धा शहरात ४५.५ डिग्री सेल्सिअस होते. ब्रम्हपुरी ४४.५, नागपूर ४४.२, चंद्रपूर ४४, अकोला शहरात ४३.५ अंश सेल्सिअस इतके तापमान होते.
अमरावती शहरात ४३ अंश सेल्सिअस तापमान होते. नागपूरचे तापमान वाढले असून उन्हाच्या चटक्यांची तीव्रता  ४७-४८ अंश सेल्सिअसइतकी जाणवत होती. त्यामुळे बहुतांश नागपूरकरांनी घरी राहणेच पसंत केले. नागपूर शहरात गेल्या वर्षी मे महिन्यात तापमानाने ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. यावेळी मात्र ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी होती. यामागील कारणांचा शोध घेतला असता, हवामानबदलाचा हा परिणाम असल्याचे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. यंदा दक्षिणेकडून मोठय़ा प्रमाणावर वारे येत आहेत. या आठवडय़ातसुद्धा या वाऱ्यांची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे इकडे तापमान वाढले ती त्याचवेळी बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांमुळे आकाशात ढग दाटून येतात. परिणामी कधी पाऊस तर कधी पावसाचे वातावरण अनुभवायला मिळते. यंदा तापमानाची तीव्रता अधिक असली तरीही तापमान मात्र कमी आहे. हा हरितगृहाचा परिणाम असल्याचे प्रा. चोपणे म्हणाले. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे हवेत ‘हिट वेव्ह’ तयार होतात आणि त्यामुळे तापमान कमी असले तरी त्याची तीव्रता मात्र अधिक जाणवते. तापमानाचे हे चक्र यावर्षी असेच कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

Story img Loader