Manipur Violence : मणिपूरमध्ये बहुसंख्याक असलेल्या मैतेइ समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरुद्ध कुकी आणि नागा या आदिवासी जमातींनी आंदोलन केल्यानंतर हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ५४ नागरिकांचा मृत्यू झाला असून तिथे तणावपूर्वक शांतता निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता राज्यात लष्कर, निमलष्करी दल आणि केंद्रीय पोलीस दल यांचे मिळून सुमारे १० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील २२ विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत.

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. तसंच, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशीही चर्चा झाली आहे. मणिपूरमध्ये अडलेल्या २२ विद्यार्थ्यांना सुखरुप महाराष्ट्रात आणण्याकरता विशेष विमान पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. या विद्यार्थ्यांना मणिपूरमधून आसामममध्ये आणण्यात येणार आहे. तेथून विशेष विमानाने ते महाराष्ट्रात परतणार आहेत. तसेच शिवसेनेचे मणिपूर राज्यप्रमुख टोबी सिंह यांच्याशी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला असून या विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर लागेल ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा >> मणिपूरमध्ये तणावपूर्ण शांतता, परिस्थिती पूर्वपदाकडे ; हिंसाचाराचे ५४ बळी

महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. यापैकी, तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी देखील मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

१३ हजार नागरिक सुरक्षितस्थळी

आतापर्यंत एकूण १३ हजार लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. लष्कराने चुराचंदपूर, मोरे, काकचिंग आणि कांगपोक्पी जिल्हे आपल्या संपूर्ण नियंत्रणाखाली आणले आहेत. काही नागरिकांना लष्करी तळांवर आश्रय देण्यात आला आहे.