रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रात व्हेल माशाचं पिल्लू वाहून आलं आहे. काल (१३ नोव्हेंबर) ओहोटी असल्याने हे पिल्लू किनाऱ्यावर आलं. मस्त्यविभागाकडून त्याला पुन्हा समुद्रात नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
व्हेल माशाचं पिल्लू पाण्याच्या प्रवाहाबरोबर किनाऱ्यावर आल्याने त्याला पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिकांनी गर्दी केली आहे. तसंच, वन विभागाकडून त्याला जीवदान देण्याचं प्रयत्न सुरू आहेत. तर, मस्त्यविभागाच्या बोटीतून त्याला समुद्रात नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. माशाच्या पिल्लूची प्रकृती अस्वस्थ असल्याने तो वाळूत रुतून बसला आहे.
कोकणातील गणपतीपुळे समुद्रकिनारी काल व्हेल माशाचे पिल्लू आढळले होते. ३० तासांहून अधिक वेळ उलटल्यानंतरही पिल्लू अद्यापही गणपतीपुळे समुद्रकिनारीच आहे. दरम्यान या माशाला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. कालपासून पर्यटक, स्थानिक नागरिक, एक्सपर्ट, एमटीडीसीचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी आणि जीव रक्षक यांच्या मदतीने या माशाला समुद्रामध्ये खेचण्याचा प्रयत्न केले जात आहेत. वीस फुटांहून अधिक लांब आणि पाच ते सहा टन इतके या माशाचे वजन आहे. दरम्यान ओहोटी असल्यामुळे सध्या रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे येत आहेत.
“बोटक्लबच्या येथून आम्ही पाहिलं की समुद्रकिनाऱ्यावर व्हेल मासा लागला आहे. त्यानुसार, आम्ही सर्व विभागांना याबाबत माहिती दिली. सर्व बचाव पथके येण्याआधी आम्ही आमच्याकडील साधनांचा वापर करून व्हेल माशाच्या जीवदानासाठी प्रयत्न केले. यावेळी पर्यटकांनीही मदत केली. तोपर्यंत इतर बचाव पथके आली. सायंकाळी भरती आल्याने व्हेल मासा समुद्रात गेला होता. परंतु, ओहोटी आल्यावर पुन्हा हा मासा समुद्र किनाऱ्यावर आला. त्यामुळे आता आम्ही बोटची वाट पाहत आहोत. त्याला बेल्टने बांधून बोटीतून समुद्राच्या खोल तळाशी सोडून देण्यात येणार आहे”, अशी माहिती रेस्क्यु डायव्हर विशाल राठोड यांनी दिली.