खेळाचे मैदान असो किंवा राजकारणाचे एखादी खेळी ही कायमच सामन्याचा निकाल पालटण्यासाठी महत्वाची ठरते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भर पावसामध्ये घेतलेली एक सभा अशाच प्रकारचे ‘वारं फिरवण्यास’ कारणीभूत ठरल्याचा दावा राष्ट्रवादीकडून अनेकदा करण्यात आलाय. पवारांची पावसातील सभा आजही अनेकांच्या लक्षात आहे. मात्र पवारांच्या त्या पावसातील सभेची रविवारी पुणेकरांना पुन्हा आठवण करुन दिली ती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी.
पुणे शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकीसमोरील चौकाचे नामकरण करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे या चौकाचे नावे नाव ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आलं. फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच पावसाचेही आगमन झाले.
पाऊस पडू लागला तेव्हा चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू होते. मात्र त्यांनी पाऊस पडू लागल्यानंतरही मध्येच भाषण न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. भर पावसामध्ये चंद्रकांत पाटील भाषण देत होते. बाजूला त्यांच्या मागेच एक व्यक्ती छत्री घेऊन उभी होती तर मंचावरील खुर्चांवर बसलेल्या काही मान्यवरांनाही डोक्यावर छत्री पकडली होती. मात्र चंद्रकांत पाटील हे पावसामध्ये भिजतच भाषण देत होते.
१८ ऑक्टोबर २०१९ ला शरद पवारांनी भर पावसात सातारा या ठिकाणी सभा घेतली होती. पाच ते सहा मिनिटांच्या त्यांच्या भाषणाने त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सगळा नूरच पालटून टाकल्याचं सांगितलं जातं.
अनेकांना पवार यांच्या याच सभेची आठवण चंद्रकांत पाटील यांच्या या सभेमुळे झाल्याचं रविवारी पुण्यात पहायला मिळालं.