एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत बंडखोर आमदारांच्या मदतीने भाजपासोबत सत्तास्थापन केली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. तसेच तुमचे आशीर्वाद असू द्या, अशी हात जोडून विनंती केली.
एकनाथ शिंदे यांनी या व्हिडीओ कॉलवर अण्णा हजारे यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. तसेच मी एकनाथ शिंदे बोलत असल्याचं सांगितलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारे यांना हात जोडून तुमचे आशीर्वाद असू द्या. तुमचं मार्गदर्शन असू द्या अशी मागणी केली. यावर अण्णा हजारे यांनी ईश्वराचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याचं म्हटलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत जे काम केलं त्याचीच ही पावती असल्याचंही हजारेंनी नमूद केलं.
व्हिडीओ पाहा :
एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारे यांना तुमचं मार्गदर्शन असू द्या आणि जेव्हा तुम्हाला काही वाटेल तेव्हा आदेश करत जा, सूचना करत जा, असंही सांगितलं. “आम्ही राज्याच्या हिताचं काम करू. देवेंद्र फडणवीस, मी व आमचे सहकारी जनतेला अपेक्षित असलेलं काम करू. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा.” एकनाथ शिंदेंसोबतच्या व्हिडीओ कॉलवर अण्णा हजारे यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आणि धन्यवाद देखील मानले.
विशेष म्हणजे या व्हिडीओ कॉलमध्ये शेवटी अण्णा हजारे माझी एकच विनंती आहे असं म्हणत आपली एक अपेक्षा व्यक्त करतात. मात्र, तेथेच हा व्हिडीओ संपतो. त्यामुळे अण्णा हजारे यांची ती एक विनंती काय हे समजू शकलेलं नाही.