सांगलीत सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची रविवारी (१५ मे) रात्री वाळव्यातील खोखो स्पर्धेच्या मैदानात डोक्यावर बेतलं ते खांद्यावर निभावलं अशी अवस्था झाली. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय निमंत्रित खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक, वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मैदानात हलगी वादक कलाकार हलगी, घुमकीच्या तालावर कसरतीचे खेळ करत होते. त्यातील एकाने डोक्याने नारळ फोडण्याची कसरत करण्यासाठी नारळ हवेत फेकला. पहिल्या वेळी नारळ कलाकाराच्या डोक्यावर आदळून जमिनीवर पडला. मात्र, नारळ फुटला नाही. यानंतर या कलाकाराने पुन्हा एकदा नारळ हवेत उंच फेकला आणि स्वतःच्या डोक्याने आघात केला. यावेळी नारळ कलाकारच्या डोक्यावर आदळून जमिनीवर पडण्याऐवजी थेट मंत्री विश्वजित कदम यांच्या दिशेने गेला.
व्हिडीओ पाहा :
कलाकाराच्या डोक्यावर आदळून नारळ गर्दीत उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या दिशेने गेला. हे पाहताच तेथे जमा झालेल्या लोकांची तारंबळ उडाली. काहींनी हात मध्ये घालत तो नारळ रोखण्याचा प्रयत्न केला. विश्वजित कदम यांनाही नारळ आपल्या डोक्यावर आदळणार हे लक्षात येताच त्यांनीही आपलं डोकं बाजूला केलं. मात्र, हा नारळ विश्वजित कदम यांच्या खांद्याला लागलाच.
हा अचानक झालेला प्रकार पाहून विश्वजित कदम यांच्यासह उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनाही हसू आवरलं नाही. यानंतर खोखो स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नियोजितपणे पुढे गेला.