संगमनेर : राहायला जिथे घर नाही, अशा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला बाथरूम कुठून असणार ? त्यातूनच जाहिरातींच्या फ्लेक्स वापरून तात्पुरता आडोसा करत, त्या बाथरूममध्ये आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा एका विकृत तरुणाने व्हिडिओ काढला. संबंधित मुलीच्या हा प्रकार लक्षात येतात तिने आरडाओरडा केला. लेकीचा आवाज ऐकत आई धावत आली. नंतर नातेवाईकांनी जाऊन संबंधित तरुणाला याबाबत जाब विचारला. परंतु त्याने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या गुन्ह्याबाबत अकबर युनूस सय्यद (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दहावीमध्ये शिकत असलेली सोळा वर्षीय पीडित तरुणी घरासमोर बॅनरच्या, म्हणजेच जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या फ्लेक्स फलकांच्या कागदाचा आडोसा करून तयार करण्यात आलेल्या बाथरूममध्ये सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होती. हे बाथरूम म्हणजे तात्पुरता आडोसा. त्याला छत नसल्याने शेजारी गवताच्या ढिगावर उभा राहून आरोपीने आपल्या जवळील मोबाईल मधून मुलीचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. बाथरूमच्या उघड्या छतातून आपला कुणीतरी आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढत असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने आरडाओरडा केल्याने आरोपीने तेथून पळ काढला.

मुलीचा आवाज ऐकून पीडित तरुणीची आई तेथे आली. तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे नातेवाईकांनी आरोपीच्या घराबाहेर जात यासंदर्भात विचारणा केली असता आरोपीने व्हिडिओ संबंधात माहिती देण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे सोमवारी रात्री पीडित तरुणीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात येत आरोपी अकबर युनूस सय्यद याच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका पोलिसांसह पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यासंदर्भात तपास करत आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून तपासी यंत्रणेने सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.