नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पहाणी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या वेळी शिंदे व फडणवीस यांनी एकाच वाहनातून शिर्डीपर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. या वेळी फडणवीस यांनी शिंदे यांच्या वाहनाचेही सारथ्य केले. मात्र हा बहुचर्चीत मार्ग नेमका कसा आहे याबद्दल अनेकांना आजही पुरशी कल्पना नाही. याच फडणवीस आणि शिंदेंच्या या पहाणी दौऱ्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात या समृद्धी महामार्गावरुन केलेल्या विशेष वृत्तांकनामधून या महामार्गाबद्दल जाणून घेऊयात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी या महामार्गाची रस्तेमार्गाने पाहणी करण्याचे शिंदे-फडणवीस यांनी जाहीर केले होते. फडणवीस शनिवारीच नागपुरात दाखल झाले होते. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी बरोबर १२.४५ वाजता त्यांनी समृद्धी महामार्गावरील प्रारंभ स्थानाहून (झिरो पॉइंट) शिर्डीकडे प्रवासाला सुरुवात केली. शिंदे आणि फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करीत होते. या वेळी फडणवीस हे स्वत: वाहन चालवत होते, तर मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते.
शिंदे आणि फडणवीस यांच्या या मार्गावरील एकत्रित प्रवासाचे प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.