बारसूतील रिफायनरी प्रकल्पाचा विरोध वाढत जात आहे. सरकारने जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे. आंदोलकांंवर लाठीचार्ज झाल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही तेथील एक व्हिडीओ शेअर सरकारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया सुळे ट्वीटमध्ये म्हणतात की, “कोकणातील बारसू रिफायनरीच्या विरोधात तेथील स्थानिक नागरीकांनी आंदोलनाची भूमिका घेतली असताना त्यांच्यावर राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करीत आहे. पोलीसांच्या लाठीमारात काही आंदोलक जखमी झाल्याचे समजते. शासनाने बळाचा वापर करण्यापेक्षा स्थानिक नागरीक व इतर घटकांशी चर्चा करुन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. स्थानिकांवर कोणताही प्रकल्प बळजबरीने लादण्याचा प्रयत्न करु नये. स्थानिकांचे म्हणणे विचारात न घेणे हे योग्य नाही. याबाबत मंत्रीमंडळातील सदस्यांनी एकत्र बसून तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे.

जितेंद्र आव्हाडही संतापले

जो काय प्रकार सुरू आहे. तो महाराष्ट्र बंद नव्हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. ही दादागिरी महाराष्ट्र सहन करणार नाही. कारण आज बारसूतील ग्रामस्थांवर जी वेळ आली आहे, ती उद्या आपल्यावरही येणार आहे. या आंदोलनात सत्यजित चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलकांचे नशिब की त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाचा ठपका ठेऊन त्यांच्यावर अद्याप देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. जास्त दांडगाई जनता सहन करत नाही, हेच या सत्ताधाऱ्यांना समजत नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >> Video: “बारसूला ७० टक्के समर्थन”, मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर रिफायनरी विरोधकांची प्रतिक्रिया; म्हणाले, “जनमत घ्या, ९० टक्के विरोधच”

आंदोलनात बाहेरचे लोक – शिंदे

“हे सर्व भूमिपूत्र आहेत, गावकरी आहेत. त्यांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प, त्यांच्यावर अन्याय करून पुढे न्यायचा नाही, अशी भूमिका सरकारची आहे. ७० टक्के पेक्षा जास्त लोकांचं समर्थन आहे. काही लोक स्थानिक होते, काही बाहेरचे लोक होते, अशी माहिती मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणतंही काम जबरदस्तीने होणार नाही, अशी ग्वाहीही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा >> “ही तर राक्षसी राजवट…” बारसूतील लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी व्यक्त केला संताप

“उद्योगमंत्रीही स्वतः शेतकऱ्यांशी बोलत आहेत. त्या भागात रोजगार देणारा हा प्रकल्प आहे. प्रकल्पाचा फायदा अधिकारी, कलेक्टर, एसपी, संबंधित विभागाचे अधिकारी समजावून सांगतील. या प्रकल्पाचा फायदा त्या भागातील लोकांना कसा होईल, हे सांगितलं जाईल. त्यांच्या सभा घेतल्या जातील, त्यांच्या संमतीनेच प्रकल्प पुढे नेला जाईल. उद्योगमंत्री स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना गावकऱ्यांना, मी शांततेचं आवाहन करतो. हे सर्व सामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video sharing that video from barsu supriya sules request to the government said rather than using force sgk