केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्याने सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपत्तीजनक आणि समाजात तेढ निर्माण करणं विधान केल्याने नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली. नारायण राणे यांना अटक करुन महाड कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र यामुळे भाजपा आणि शिवसेनेत मोठा वाद निर्माण झाला आहे.

यादरम्यान वाहतूक मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अनिल परब पोलिसांना कोणताही उशीर न करता नारायण राणे यांना अटक करा असा आदेश देत आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री असणारे अनिल परब मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना दोन वेळा त्यांना फोन आल्याने पत्रकार परिषद थांबवली होती.

जामीन मिळाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले…

पत्रकार परिषदेत फोनवर बोलणाऱे अनिल परब यांचं संभाषण यावेळी तेथील माईकमुळे ऐकू येत होतं. पहिल्या कॉलनंतर अनिल परब यांनी पोलीस अधिकाऱ्याला दुसरा फोन लावला.

“हॅलो तुम्ही लोक काय करत आहात? पण तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे की नाही?….कोणती ऑर्डर ते लोक मागत आहेत? हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन (अर्ज) नाकारला आहे….मग पोलीस बळाचा वापर करा,” असं अनिल परब फोनवर बोलताना ऐकू येत होतं.

“माझा राजा, माझा नेता…,” नारायण राणेंच्या जामीनावर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यावेळी अनिल परब यांच्या शेजारीच बसले होते. यावेळी ते राणेंना अद्याप ताब्यात घेतलं नसल्याचं भास्कर जाधवांना सांगत असल्याचं ऐकू येत आहे.

परब पुढे सांगतात की, “पोलिसांचा पहारा असलेल्या घरात बसलेले आहेत. जेव्हा पोलीस आतामध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली आहे. पोलीस आता त्यांना बाहेर आणतील”.

यानंतर तिथे उपस्थित पत्रकारांना अनिल परब यांना नारायण राणेंच्या अटकेसंबंधी विचारलं असता त्यांनी आपल्याकडे पूर्ण माहिती नसून सध्या काही सांगू शकत नसल्याचं उत्तर दिलं होतं.

Story img Loader