कर्नाटकचे मुख्यमंत्री नेमके कोण होणार यावर तीन दिवस बराच खल चालला. चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र सिद्धरामय्या की डी. के. शिवकुमार कुणाचं नाव फायनल करायचं? यावर एकमत होत नव्हतं. शेवटी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी एक फोन फिरवून डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय झाला. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर डीके शिवकुमार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले. डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानल्याने मुख्यमंत्री पदाचा पेच संपला आणि कर्नाटकात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. डीके शिवकुमार यांनी जास्त आडमुठेपणा न दाखवता उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत कौतुक होतंय. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांचं कौतुक केलंय.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवणं काँग्रेससाठी सोपं नव्हतं. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होती. माझ्यासोबत १३६ आमदार आहेत असं डीके शिवकुमार यांनी ठणकावून सांगितलं होतं. तसंच राहुल गांधींना भेटल्यानंतरही ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते असंही सांगतिलं जात आहे. पण सोनिया गांधींनी एक फोन फिरवला आणि सर्व समस्या एका फोनवर सुटल्या. यानंतर प्रतिक्रिया देताना शिवकुमार यांनी आम्ही एक असल्याचीही प्रतिक्रिया दिली होती.तसंच तुम्ही नाराज आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मी नाराज का असेन? अजून बराच पल्ला गाठायचा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
पक्षादेश पाळत डीके शिवकुमार यांनी पक्षनिष्ठेचे उदाहारण घालून दिले आहे. यावरून जितेंद्र आव्हाड म्हणतात की, “या माणसाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्याची बांधिलकी, त्याची निष्ठा… तो ज्या प्रकारे पक्ष आणि नेत्याच्या पाठीशी उभा आहे…. आजकाल दुर्मीळ गुण आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
उद्या शपथविधी
उद्या २० मे रोजी कर्नाटकात शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी अनेक मंत्रीही मंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. तर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार एनसी अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनाही आमंत्रण पाठवण्यात आले आहे.