Ashadhi Ekadashi Wari Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Alandi : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानवेळी पोलिसांनी वारकऱ्यांवंर सौम्य लाठीमार केला. याप्रकरणी राज्यातील राजकारण तापलं असून विरोधकांनी या प्रकरणावरून टीकास्त्र सोडलं आहे. आता, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणी वैदिक ब्राह्मण्यवादी वर्गााचा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल नेमकं काय घडलं?

पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं देवस्थानने निर्णय घेतला आहे. तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली. असं असताना काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. लाठीमार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या बडतर्फीची मागणी करण्यात येत आहे. तसंच, याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली आहे.

हेही वाचा >> “भाजपा आपली राजकीय मस्ती दाखवायला…”, वारकरी लाठीमारप्रकरणी संजय राऊतांचा संताप, म्हणाले, “धर्माभिमानी एकनाथ शिंदे…”

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याची घटना घडली. शिस्तप्रिय आणि कोणाला त्रास न देता निघणाऱ्या वारीवर हल्ला करणं हे कोणत्या मानसिकतेचे द्योतक आहे? वैदिक ब्राह्मण्यवादी वर्ग हा नेहमीच संत परंपरेचा दुश्मन राहिलेला आहे. संत परंपरेला नेहमीच संपवण्याचे काम वैदिकांनी केले आहे. वारकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा आम्ही पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करतो”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

संजय राऊतांचीही टीका

संजय राऊत म्हणाले की, “पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो की महाराष्ट्रात औरंग्याची औलाद कशी काय निर्माण झाली. ती काल आम्ही पाहिली तुमच्या राजवटीत. याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आहे. आळंदीच्या वारीचं नियोजन राजकीयदृष्ट्या आपल्या हातात असावं. देवळात कोणी जावं, किती लोकांनी जावं, कसं जावं याचं नियोजन भाजपाचे काही बोगस आचार्य, प्राचार्य, दृढाचार्य तिथे बसून करत होते. यातून वारकरी आणि त्यांच्यात वाद झाला. शेवटी, ती परंपरा संस्कृतीची वारकऱ्यांची आहे. राजकीय टग्यांची नाही. त्यातून पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीमार करावा लागला. बेदमपणे वारकऱ्यांना मारताना चित्र दिसतंय, त्यामुळे लाठीमार झाला हे कोणी नाकारच शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video vedic brahminical class always prakash ambedkars attack on warkari lathi case said to put an end to the saintly tradition sgk