घाटकोपर परिसरातील काही गुजराती पाट्यांची दोन दिवसांपूर्वी मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. याबाबत मंगळवारी भाजपचे काही नेते आणि गुजराती बांधवांनी घाटकोपर परिसरात आंदोलन करीत मनसे आणि शिवसेनेचा निषेध केला. दरम्यान, मुंबई पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या की शिवसेनेकडून मराठी भाषेचा विषय उकरून काढला जातो, असा आरोप सातत्याने केला जातोय. त्यावर आशिष शेलार यांनीही आज प्रतिक्रिया दिली. वाघनखं महाराष्ट्रात येणार आहेत, त्याआधी वाघनखांचा इतिहास सर्वांना समजावा याकरता भाजपाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्याकरता आशिष शेलारांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
“उद्धव ठाकरेंच्या गटाकडून षडयंत्र, कटकारस्थान रचलं जातं. उद्धव ठाकरेंचं हा कुहेतू आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जातीय जनगणनेचा विषय का केला नाही? मात्र, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यावर त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यामागे काय हेतु आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हिंदू मुर्ख नाहीत
“मोदींच्या मागे समस्त देश आहे आणि आज एकत्र हिंदूंना असं वाटतंय की एकत्रित राहून देशाच्या विकासात योगदान दिलं पाहिजे. त्यामुळे हिंदू एकत्र येतोय याची उद्धव ठाकरेंना भीती आहे.त्यामुळे हिंदू मोर्चे का काढतात असा प्रश्न सभेत ते विचारतात. हा प्रश्न तर AIMIMने विचारला पाहिजे. उद्धवजी तुम्ही का विचारता? AIMIM ला उत्तर देऊ. हिंदू एकत्र आला की उद्धव आणि त्यांच्या पक्षाच्या डोक्यात प्रश्न पडायला लागतात. वाघनखे हा सुद्धा तसाच वाद आहे. कारण नसताना गुजरातील बोर्डांवर कारवाई करणं, आंदोलन करणं हा त्यातीलच भाग आहे. परंतु, हिंदू मुर्ख नाही. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवर गेल्यावर तुम्हाला मोहम्मद अली रोडवरील बोर्डांना पाहणार नाही, आणि घाटकोपरच्या गुजराती बोर्डांना पाहणार हे हिंदूना कळत नाही असं नाही”, असंही ते म्हणाले.
‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानांचा वध करताना वापरलेली वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते डॉ. राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान तर शाहीर नंदेश उमप यांचे पोवाडा सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम गुरुवारी (ता.१२) रोजी सायंकाळी ५.३० वा. दादर (प.) येथील स्वा. सावरकर सभागृहात होईल.
ज्यांच्या मनात शंकेची कीड वळवळत आहे त्यांनी…
यावेळी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, लंडनमधील संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आणण्याचा करार महाराष्ट्र सरकारने केला. नोव्हेंबरमध्ये वाघनखे तीन वर्षांसाठी येणार आहेत. मुंबई, नागपूर, सोलापूर, सातारा यासह महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये या शौर्य पराक्रमी वाघनखे जनतेसाठी खुली असतील. काही शंकेखोर टवाळांनी यावर शंका व्यक्त केली आहे. ज्यांच्या मनात, बुद्धीत टवाळक्या करणे याशिवाय दुसरं काही नाही, अशा पक्षातील नेत्यांनी म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी यावर प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. तो कोथळा विचारांचा असेल. ज्यांच्या मनात शंकेची कीड वळवळत आहे त्यांनी आपल्या बुद्धीत भर घालण्यासाठी कार्यक्रमाला यावे”, असे आवाहन आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.
हिंमत असेल तर…
विशिष्ट वर्गाची मते येणाऱ्या लोकसभेला, महानगरपालिकेला आपल्याला मिळाली पाहिजेत, यासाठी हे होत आहे. मतांसाठी लांगूलचालन सुरू आहे. म्हणून अफजलखानाचा कोथळा काढला हे नको, तो इतिहास नको, वापरलेली वाघनखे नको, ती वाघनखे खरी आहेत का? अशी शंका विशिष्ट वर्गाला बरं वाटण्यासाठी उपस्थित केली जाते. हे सगळं नियोजित आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता ते पाहत आहे. आजही उर्दू, फारसी, अरबी भाषेतील बोर्ड डोंगरी, पाथमोडी ते मोहम्मद अली रोडवर आहेत. त्याच्यावर कोण काळे लावत नाही. त्याची मोडतोड करत नाहीत. आज डोंगरी आणि पाथमोडी रस्त्यावर न जाणारे घाटकोपरला गुजराती शब्दांवर तोडफोड करायला चालले आहेत. हिंमत आहे तर डोंगरीला जा..! अजूनही तिथे बोर्ड आहेत. तिकडे तोडफोड करा, काळं फासा… विशिष्ट वर्गाची मते हवेत म्हणून तिकडे जायची हिंमत यांच्यात नाही, अशीही टीका त्यांनी केली.