विधिमंडळाचं पावसाळी अधिवशेन सुरु असून सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. यानंतर सत्तारी पक्षाचे आमदार आक्रमक झाले आणि अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर आज दुपारी विधानपरिषदेमध्ये अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीसाठी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ केल्याने काही वेळासाठी कामकाज स्थगित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सभागृह पुन्हा सुरु झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडला.

चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं. मात्र, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करण्याची मागणी केली. या प्रस्तावावर चर्चा करण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शिविला. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानपरिषदेत घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध करत ते काहीसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : “अपमान झाला असल्यास मी माफी मागतो, पण…”; अंबादास दानवेंच्या विधानानंतर उद्धव ठाकरेंकडून माफी

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अशा प्रकारच्या ठरावावर कधीही चर्चा झालेली नाही. ठराव संमत झाल्यानंतर चर्चा होत नाही. अशा ठरावावर कधीही चर्चा होत नाही. हा चुकीचा पायंडा पडला जात आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी चर्चा करण्याची केलेली मागणी फेटाळून लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस काहीसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विरोधकांनी काहीवेळ सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला.

अंबादास दानवे-प्रसाद लाड यांच्यात काय घडलं होतं?

संसदेच्या अधिवेशनामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानाच्या निषेधाचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडण्याची मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती. मात्र, यावर बोलताना अंबादास दानवे यांनी हा विषय येथील सभागृहातील नाही, असं म्हणत विरोध केला. त्यानंतर आमदार प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत अंबादास दानवे यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर आज अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले.