नांदेडच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अमर राजुरकर विजयी झाले आहेत. राजुरकर यांनी श्यामसुंदर शिंदे या अपक्ष उमेदवाराचा पराभव केला आहे. अमर राजुरकर यांनी २५१ मते मिळवत विधान परिषद निवडणुकीत विजय साकारला. काँग्रेस विरुद्ध इतर सर्व पक्ष, अशी लढत नांदेडमध्ये पाहायला मिळाली. यामध्ये काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसच्या या यशात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मोठा वाटा आहे.
अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असल्याने आणि त्यातच राजुरकर अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जात असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. सहा वर्षांपूर्वी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेल्या राजूरकर यांना यावेळी श्यामसुंदर शिंदे या माजी सनदी अधिका-याने चांगले आव्हान उभे केले आहे. शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने पाठिंबा दिला होता.
अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेने ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेच्या विजयासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक घेतली होती. या निवडणुकीसाठी विशाल युती झाल्याने शिंदेंचा विजय निश्चित असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. तर अमर राजुरकर मैदानात असल्याने अशोक चव्हाण यांनी कंबर कसली होती. आजी-माजी मुख्यमंत्री आमनेसामने असल्याने नांदेडमधील निवडणूक प्रतिष्ठेची झाली. अखेर या लढतीत अशोक चव्हाण यांनी वर्चस्व सिद्ध केले.
नांदेड विधानसभा परिषदेच्या निवडणुकीत एकूण मतांची संख्या ४७२ मते होती. यामध्ये काँग्रेस २०१, राष्ट्रवादी काँग्रेस १०६, शिवसेना ५१, भाजपा १०, लोकभारती १३, एमआयएम १२, मनसे ९, स्वीकृत सदस्य ३७ आणि इतर अशी मते होती. या निवडणुकीत भाजप, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जात काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीयांचे आव्हान मोडीत काढत काँग्रेसचा झेंडा फडकवला.