शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दरबारी प्रलंबित आहे. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग केल्यानंतर आतापर्यंत दोनवेळाच सुनावणी झाली. दुसऱ्या सुनावणी दरम्यान या प्रकरणी वेळापत्रक तयार करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी राहुल नार्वेकर यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१६ आमदारांच्या अपात्र प्रकरणाविषयी राहुल नार्वेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, “या विषयावर अधिक बोलणं उचित राहणार नाही. या याचिका ठरवत असताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही. परंतु, कोणत्याही प्रकारची घाईही केली जाणार नाही. ज्यामुळे अन्याय होईल. कालच्या निकालात सुनावणी कशी होणार, त्याची प्रक्रिया काय असणार यासंदर्भातील माहिती सर्व पक्षकारांना दिली आहे. त्याचप्रमाणे ही कारवाई पुढे जाईल. लवकरच यासंदर्भातील निकाल देऊन या विषयाला मार्गी लावू.”

हेही वाचा >> आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणी लांबणीवर; एकत्रित की स्वतंत्र? निर्णय १३ ऑक्टोबरला

“अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. न्यायालायनेही योग्य ती सूचना दिली आहे. न्यायालयाचा मान राखला जाईल. अध्यक्षांचीही बाजू न्यायालयात मांडली जाईल”, असंही स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी होत असलेल्या दिरंगाईबद्दल दिलं.

हेही वाचा >> VIDEO: “नार्वेकरांना कुणी काय मार्गदर्शन केलं याची…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल, म्हणाले…

दुसऱ्या सुनावणीत काय झालं?

विधानसभा आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्यायची की एकत्रित यासंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर १३ ऑक्टोबरला देणार आहेत. वेळकाढूपणा न करता एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने अध्यक्षांकडे केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhansabha president rahul narvekar explained his view on mla disqualification case sgk