सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी सुरू करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशानंतर आता राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे ते आता काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर दिल्लीला नेमक्या कोणत्या कारणासाठी गेले आहेत, यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.
राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “आमचे दिल्लीतील वकील, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडली. त्यांच्याशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय आहे? हेही समजून घ्यायला पाहिजे. यासाठी राहुल नार्वेकर दिल्लीला गेले आहेत. त्यात विशेष काही नाही.”
हेही वाचा- “पक्षाचं नाव आणि चिन्ह अजूनही उद्धव ठाकरेंना मिळू शकतं”, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचं सूचक विधान
“सर्वोच्च न्यायालयाने काही कालमर्यादा दिली नाही. पण न्यायालयाने सांगितलंय की, ही कारवाई थोडी जलद गतीने करा. यासाठी प्रक्रिया डावलून कारवाई करा, असं म्हटलं नाही. त्यामुळे प्रक्रियेप्रमाणे ही कारवाई करायची आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांसाठी जेवढा वेळ लागणार आहे, त्यासंदर्भात दिल्लीत चर्चा होईल,” अशी माहिती शिरसाट यांनी दिली.
हेही वाचा- सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे निर्देश; म्हणाले, “एका आठवड्याच्या आत…”
आमदार संजय शिरसाट पुढे म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार काय आहेत? या दोन्ही न्यायीक संस्था आहेत. यामध्ये कुठे ना कुठे एकमेकांच्या अधिकारांवर गदा येतेय का? हाही प्रश्न उपस्थित होतोय. म्हणून कदाचित या चर्चेसाठी राहुल नार्वेकर दिल्लीला गेले आहेत.”