कडाक्याच्या उन्हाने होरपळत असलेल्या विदर्भातील जिल्ह्य़ांमध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. चढत्या पाऱ्याचा सर्वाधिक तडाखा यंदा चंद्रपूर जिल्ह्य़ाला बसला असून, त्यापाठोपाठ नागपुरातही विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. दोन्ही शहरांचे तापमान तब्बल ४८ अंशांच्या जवळ पोहोचल्याने उष्माघात आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्य़ांमध्ये यंदा पाणीटंचाईचा प्रश्न आणखी तीव्र झाला असून, मान्सूनच्या पहिल्या पावसापर्यंत दिवस कसे काढायचे, याची चिंता लोकांना लागली आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी पंखे, कूलर आणि एसीचा वापर सुरू असल्याने विजेची मागणीही अचानक मोठय़ा प्रमाणात वाढली असून, दुपारच्या झळा सहन करण्यापेक्षा लोक घरातच किंवा कार्यालयातच राहणे पसंत करीत आहेत. चंद्रपुरात कोळशाच्या ओपन कास्ट खाणींची संख्या जास्त असल्याने हिवाळ्यातही सरासरी तापमान ४० अंशापेक्षा जास्त असते. लोक बिसलरी, शीतपेये, आइस्क्रीमने शरीराचा दाह कमी करत आहेत. सकाळी आणि सायंकाळी जलतरण तलावांवर झुंबड उडत आहे.
विदर्भात या वेळी उन्हाचा तडाखा आधीच्या नोंदींच्या तुलनेत जबरदस्त असून, ज्यांच्याकडे पंखा, कूलर नाही अशी गरीब कुटुंबे दुपारचा वेळ झाडाच्या सावलीत काढत आहेत. अनेक घरांमधील लोक दुपारी बगिचांमध्ये जात असून सायंकाळी घरी परतत आहेत. गरीब कुटुंबांच्या घरात तापमान कमी करण्यासाठी वाळ्याच्या ताटय़ा लावलेल्या दिसतात. ग्रामीण भागात भारनियमनामुळे दुपारचा वेळ काढणे असह्य़ झाले आहे. लोक घरासमोर पाण्याचा शिडकावा करून वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हॉटेल, धाबे, रेस्टॉरंटमध्ये कूलर, एसीची व्यवस्था आहे. अनेक दुकाने झाडांच्या आश्रयाने सुरू आहेत. खेडेगावातील मातीची घरे थंड ठेवण्यासाठी रोज शेण-मातीने सारवली जात आहेत. कडुनिंब किंवा शिंदी वा नारळाच्या झाडांच्या पानांचे आच्छादन करण्यात आल्याने दुपार थोडीफार सुसह्य़ होते. विदर्भातील बहुतांश ग्रामीण भागातील हे सध्याचे सार्वत्रिक चित्र आहे. मेळघाट, ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमधील शेकडो गावांमध्ये वीजपुरवठा नाही. त्यामुळे कौलारू घरे थंड करण्यासाठी अनेकांकडे हिरवी जाळी अंथरण्यात आली आहे. शहरांमध्ये दुपारी बाहेर निघणारे तोंडाला दुपट्टे बांधूनच निघत आहेत. अनेक जण जवळ कांदा बाळगतात, निघण्यापूर्वी आंब्याचे पन्हे वा ताक पिऊनच मग बाहेर पडतात. एखाद्या झाडाच्या आश्रयाने वाहनधारक उभे असलेले दिसतात. गेल्या तीन दिवसांत एकटय़ा नागपूर शहरात गॅस्ट्रोचे साडेपाचशे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून, तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. टय़ूशन क्लासेसचा धंदा जोरात आहे, परंतु वर्गाची वेळ एकदम सकाळी किंवा सायंकाळी अशी ठेवण्यात आली आहे.

प्राण्यांच्या थंडाव्यासाठी व्यवस्था
प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचे उन्हापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, अनेक ठिकाणी पिंजऱ्यांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांसाठी कूलर  लावण्यात आले आहेत. सकाळ, दुपार, सायंकाळी प्राण्यांवर पाणी फवारले जात आहे. त्यांच्यासाठी पाण्यात डुंबण्याची व्यवस्था चोखपणे करण्याचे आदेश वन खात्याने दिले आहेत. जंगलातील पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे रोज भरले जावेत, याची खबरदारी वन अधिकारी घेत आहेत. महाराजबाग प्राणिसंग्रहालयात वाघ, अस्वल, बिबटय़ांच्या पिंजऱ्यांमध्ये लावलेले कूलर दिवसभर सुरू राहतात. यात पाणी भरण्यासाठी खास कर्मचारी त्यांच्या दिमतीला देण्यात आले आहेत. पाळीव प्राण्यांच्या गोठय़ांवरही हिरव्या जाळीची आच्छादने किंवा झाडांचा पाला टाकून थंडावा देण्यात येत आहे.