परशुराम आणि त्याची कुऱ्हाड हे लेखणीचे स्वरूप होत नाही. २१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणारा आदर्श बहुजनांचा नाही. याचा विचार बहुजन समाजातील साहित्यिक विचारवंतांनी करावा, असे सांगतानाच, चिपळूण येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनावर बहिष्कार टाका, असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य सरचिटणीस कॉ. धनाजी गुरव व माजी संमेलनाध्यक्ष राजा शिरगुप्ते यांनी केले आहे.
आम्ही हे संमेलन उधळून लावणार नाही, पण विद्रोही चळवळीतील सर्वानी संमेलनास उपस्थित राहू नये म्हणून खबरदारी घेऊ, असे ते म्हणाले. राबणाऱ्या बहुजनांचा शत्रू असलेल्या परशुरामाच्या कोडकौतुकासाठी जातीयवादी विचार वाहणाऱ्या अखिल भारतीय संमेलनास २५ लाख रुपये सरकारने देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी येथील नगरपालिका पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
म. जोतीराव फुले यांनी परशुरामाचे व राबणाऱ्या बहुजन समाजाचे नाते कसे होते, पौराणिक साहित्यात परशुरामाने बहुजन समाजावर कसे अनन्वित अत्याचार केले, हे सविस्तर मांडले होते. अशा वेळी उठताबसता म. जोतीराव फुलेंचे नाव घेणारे व फुले-शाहू-आंबेडकरांचे जयघोष करणारे वास्तवाला सामोरे कसे जात नाहीत, असा प्रश्नही गुरव यांनी उपस्थित केला.
ब्राह्मणी जातीय व्यवस्थेविरोधात विद्रोही चळवळ उभी राहत आहे. राज्य घटनेनुसार सरकारी कार्यालयात सत्यनारायण, दत्तपूजा होऊ नये; तसेच मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्यातही गणेशपूजन सरकारी खर्चात होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ११वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन १९ व २० जानेवारी रोजी होत आहे. हे संमेलन संत गाडगेबाबा साहित्यनगरी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, राहुरी येथे होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
‘‘आम्ही हे संमेलन उधळून लावणार नाही, पण विद्रोही चळवळीतील सर्वानी संमेलनास उपस्थित राहू नये म्हणून खबरदारी घेऊ – धनाजी गुरव