Vijay Shivtare On Maharashtra Government Formation : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीकडून सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यात येत आहेत. निवडणुकीचा निकाल लागून तब्बल आठ दिवस होऊन गेले आहेत. तरीही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. यातच मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत सस्पेंस कायम आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृहखातं मागितल्याची चर्चा आहे. मात्र, गृहखातं देण्यास भाजपाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. यातच एकनाथ शिंदे हे दोन दिवस साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी गेले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे हे आज ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी आहेत. मात्र, ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती घेत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांची त्यांच्या पक्षातील आमदार आणि नेते मंडळी भेट घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे नेते (शिंदे) विजय शिवतारे यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांची ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र, या भेटीवेळी पोलिसांनी विजय शिवतारे यांची गाडी गेटवर अडवल्यामुळे विजय शिवतारे हे पोलिसांवर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. “तुम्हाला माजी मंत्री, आमदार ओळखता येत नाही का?”, अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी पोलिसांना सुनावलं.

हेही वाचा : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका

नेमकं काय घडलं?

विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांची गाडी गेटवरच अडवली. यावेळी विजय शिवतारे यांनी पोलिसांशी बोलताना म्हटलं की, “किती वर्ष झाले तुम्हाला इथे आहात? तुम्हाला माजी मंत्री, आमदार ओळखता येत नाहीत का?”, असं म्हणत विजय शिवतारे हे पोलिसांवर संतापले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना ओळखलं नसल्यानं गाडी आडवल्याचं सांगितलं जात आहे.

विजय शिवतारेंनी शिंदेंची भेट का घेतली?

“मी छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो. त्यानंतर आज मुंबईत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि भेटण्यासाठी आलो होतो. एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक आहे. पण आजच्या दिवस त्यांना आराम करावा लागेल. तसेच आज कोणत्याही बैठका नव्हत्या. मला आता एकाने सांगितलं की, अशा बातम्या सुरु आहेत की बैठक बोलावली होती. पण कोणतीही बैठक बोलावली नव्हती. खाते वाटपासंदर्भातील सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळे ते जे ठरवतील ते सर्वांना मान्य असेल”, असं विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.