अजित पवार यांच्याविरोधात बारामतीमध्ये बंड पुकारणाऱ्या विजय शिवतारेंनी अखेर माघार घेत आपले बंड शमल्याचे जाहीर केले. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यंमत्र्यांसह विजय शिवतारेंचा एक फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यावरून विजय शिवतारे निवडणुकीचा हट्ट सोडणार, हे निश्चित झाल्याचे बोलले जात होते. आज पुरंदर येथे पत्रकार परिषद घेऊन विजय शिवतारे यांनी बंड पुकारण्यापासून ते माघार घेईपर्यंतचा सर्व घटनाक्रम सविस्तर सांगितला. शिवतारेंच्या नरमाईमुळे आता महायुतीमधील मोठा तिढा सुटला आहे. तसेच महायुतीच्या अद्याप जाहीर न झालेल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासमोरील अडचणींचा डोंगर कमी झाल्याचे बोलले जात आहे.
नेत्यांना न ऐकणारे शिवतारे ओएसडींच्या फोनमुळे नरमले
विजय शिवतारे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावले होते. पण त्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र नेत्यांना न ऐकणारे शिवतारे मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीच्या फोनवरून नरमले. याबद्दलचा किस्सा त्यांनी स्वतः आज पत्रकार परिषदेत सांगितला. शिवतारे म्हणाले, “२६ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांचे खतगावकर नावाच्या ओएसडींचा मला फोन आला. त्यांनी माझी समजूत काढली. माझ्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री आणि महायुतीमध्ये अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक मतदारसंघात असे अपक्ष उमेदवार उभे राहिले तर महायुतीसमोर अडचण उभी राहिल. ज्यामुळे महायुतीचे खासदार पडू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीच्या फोनमुळे मी माझा विचार बदलला.”
पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड झाले थंड… ‘वर्षा’वर काय घडले?
“या फोननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह २७ मार्च रोजी रात्री ११ ते २ अशी तीन तास चर्चा झाली”, असे शिवतारे म्हणाले. मागच्या पाच वर्षात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, हे मी त्यांच्या कानावर घातले. माझ्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, त्यापैकी गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. आचारसंहितेमध्ये या योजनेचे पेपरवर्क पूर्ण करून आचारसंहिता संपल्यानंतर कामाचे निर्देश देण्यात येतील, अशी माहिती शिवतारे यांनी दिली.
घड्याळाला पुरंदरमधून दीड लाख मते देणार
पुरंदरमध्ये संपूर्ण शिवसेनेची सर्व आणि एकूण दीड लाख मते महायुतीचा उमेदवाराला म्हणजे घड्याळाला गेली पाहीजेत, असे स्पष्ट आदेश मी माझ्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा सत्तारूढ करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करू, असा विश्वास शिवतारे यांनी व्यक्त केला.
दादांच्या हातून काही चूका झाल्या…
यावेळी बोलत असताना शिवतारे म्हणाले की, याआधी दादांच्या (अजित पवार) हातून काही चूका झाल्या असतील, पण मोठे ईप्सित गाठण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचा ठराव आम्ही केला आहे. कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन करण्यासाठी अजित पवार स्वतः पुरंदरमध्ये येणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे. राजकराणामध्ये कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. या सूत्रानुसार आम्ही मागच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवाराला बहुमत निवडूण आणणार आहोत, असेही ते म्हणाले.