शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणुकीमधून माघार का घेतली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय आश्वासन दिले? यासंदर्भात विजय शिवतारे यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच मतदारसंघातील प्रश्न संघर्ष करुन सोडविण्यापेक्षा ते तहामध्ये सुटत असतील तर उर्जा कशाला वाया घालवायची, असे मत विजय शिवतारे यांनी व्यक्त केले आहे.
विजय शिवतारे काय म्हणाले?
“बारामती लोकसभेच्या निवडणुकीतून मी माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, याचा फटका महायुतीला आणि शिवसेनेला बसत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे मी असे ठरवले की, जर संघर्ष टाळायचा असेल तर माझ्या मतदारसंघामधील अडकलेले विकासकामे होणे गरजेचे आहे. कारण मतदारसंघातील कामांचे मोठे नुकसान झाले आहे. आज तालुक्यात दुष्काळ आहे. मग तीन वर्षाच्या काळात नदीचे पाणी मतदारसंघात फिरायला पाहिजे होते. आज पिण्यासाठी पाणी नाही. असे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आपण एक जनसंवाद सभा घेऊन त्या सभेच्या माध्यमातून तिघांनीही (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) जनतेला आश्वासित करा, म्हणजे मी निवडणुकीतून माघार का घेतली? याबाबत लोकांचा गैरसमज दूर होईल. शेवटी संघर्ष करुन जे मिळवायचे ते तहामध्ये मिळत असेल तर उर्जा कशाला वाया घालवायची”, असे विजय शिवतारे म्हणाले.
हेही वाचा : ‘एकनाथ खडसेंना घेऊन चूक केली’, शरद पवारांनी व्यक्त केली खंत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय होणार का?
“निवडणुकीमधून माघार ही महायुतीसाठी घेतली आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. देशाच्या हितासाठी भाजपाची सत्ता केंद्रात असली पाहिजे. आता आमचा स्थानिक विषय होता, त्यांच्या (पवार कुटुंबाच्या) शिवाय इतरांना का संधी नाही? पण हे सर्व मिटले आहे. त्यामुळे महायुतीचा प्रचार करायलाच हवा. माझ्या दृष्टीने सुनेत्रा पवारांना मत म्हणजे मोदींना मत. त्यामुळे हे मतदान आम्ही मोदींसाठी करत आहोत. उमेदवार कोणीही असू द्या, पण मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत”, असे विजय शिवतारे म्हणाले.
निवडणुकीतून माघार घेऊ नये, यासाठी कोणाचे फोन आले? यावर बोलताना विजय शिवतारे म्हणाले, “बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेऊ नये यासाठी मला संपूर्ण महाराष्ट्रामधून फोन येत होते. त्यामुळे कोणाचे नाव सांगायचे आणि कोणाचे नाही. पण जे आहे ते संभ्रमात राहिलेलेच बरे”, असे विजय शिवतारे म्हणाले. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.