मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही अयोध्या दौऱ्यावर आहेत. या अयोध्या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. “अयोध्या दौरा हा श्रद्धेचा विषय असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातंय. त्यांची श्रद्धा अयोध्येत आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीशी निगडीत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसत, त्यांना संकट काळात मदत कशी करता येईल? यावर आमची श्रद्धा आहे. प्रत्येकाचे धोरण वेगळे असू शकते,” अशा शब्दांत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं.
शरद पवारांच्या या विधानानंतर शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामागे हाच मुख्य हेतू आहे,” अशा शब्दांत शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येत, तर आमची…”, शरद पवारांचे नाशिकमध्ये विधान
“राज्य संकटात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन बसले आहेत. शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे” या शरद पवारांच्या विधानाबाबत विचारलं असता विजय शिवतारे म्हणाले, “शरद पवार हे नास्तिक आहेत. ते नास्तिक आहेत, हाच त्यांच्या बोलण्याचा हेतू आहे. ते आता कुठे पळापळ करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींवर बारकाईने लक्ष दिलं जात आहे. सर्व कामे होत आहेत. विरोधक हे विरोध करायचा म्हणून बोलतात.”
बंडखोर आमदारांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा ते अयोध्येत जाऊन का बसले नाहीत? थेट गुवाहाटीला का गेले? बेइमानी केल्यानंतर त्यांना आता राम आठवतो का? या राऊतांच्या टीकेबद्दल विचारलं असता विजय शिवतारे पुढे म्हणाले, “खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येत राम मंदिराचं काम सुरू आहे. त्या कामाची पाहणी करणे. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणे, यासाठी आम्ही अयोध्येत आलो आहोत. मी जेव्हा मुख्यमंत्री बनेल, तेव्हा मी अयोध्येला जाईल, असा शब्द त्यांनी (एकनाथ शिंदे) आधीच दिला होता.”