बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे पुरंदरचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पवार यांचे ऐकेकाळचे राजकीय वैरी अनंतराव थोपटे यांची बुधवारी भेट घेतली. ‘जुन्या गोष्टी विसरू नका, साथ द्या’, असं आवाहन शिवतारे यांनी थोपटे यांना केलं आहे. या भेटीमुळे बारामती लोकसभेच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारे बारामती लोकसभेत फिरत आहेत, कार्यकर्त्यांना भेटत आहेत, या मतदारसंघात अजित पवारांविरोधात मोर्चेबांधणी करत आहेत. विजय शिवतारे सातत्याने अजित पवारांविरोधात वक्तव्ये करत असल्यामुळे महायुतीतलं वातावरण तापलं आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्यांनी शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारे यांना भेटीसाठी बोलावलं होतं. या भेटीनंतर शिवतारे यांनी सांगितलं की, मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, महायुतीत बारामती लोकसभेची जागा मागून मला तिथून तिकीट द्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे गटातील नेते विजय शिवतारे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, महायुतीत बारामती लोकसभेची जागा आपण मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. ही जागा आपल्याला मिळाल्यास तिथे आपण १०० टक्के जिंकू शकतो. धनुष्यबाणाच्या चिन्हावर इथे निवडणूक लढलो तर आपण ही निवडणूक जिंकू. मी गेल्या १५-२० दिवसांमध्ये बारामतीत अनेक ठिकाणी फिरलो आहे. लोकांशी चर्चा केल्यानंतर मला आत्मविश्वास मिळाला आहे. तसेच या मतदारसंघातील मतांचं गणित मी मुख्यमंत्र्यांपुढे मांडलं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना त्यांना सांगितलं आहे की, अगदीच गरज पडली तर मी भाजपाच्या चिन्हावर बारामती लोकसभा लढवण्यास तयार आहे.

विजय शिवतारे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून युतीत बारामती लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे ही जागा मिळाली नाही तर भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याला माझी हरकत नाही. मी कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार आहे. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. गेले दोन दिवस विचारमंथन करून, लोकांशी बोलूनच मी या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे. महायुतीत जर अशा पद्धतीने निर्णय झाले तर ते सोयीस्कर होतील. शिवतारे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> “आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी तब्बल १४६ रुपये/लिटर दराने दूध खरेदी”, रोहित पवारांकडून कथित दूध पुरवठा घोटाळ्याचा पर्दाफाश

शिवतारे म्हणाले, मी अगदी स्पष्ट सांगतो की, प्रत्येक मतदारसंघातील इलेक्टिव्ह मेरिट पाहायला हवं. कारण आपल्यासाठी एकेक खासदार महत्त्वाचा आहे. आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. मी अपक्ष लढण्याचा विचार केला. परंतु, असं अपक्ष लढण्याऐवजी मी आमच्या नेतेमंडळींना म्हटलं आहे की, तुम्ही महायुतीत बारामती लोकसभेची जागा मागावी. ती जागा मिळाल्यास मी १०० टक्के ही जागा जिंकून दाखवेन.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay shivtare says i ready to contest baramati lok sabha election with bjp ticket asc