शिवसेना ( शिंदे गट ) नेते विजय शिवतारे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्र डागत आव्हान दिलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दम असेल किंवा लोकाभिमूख असाल, तर स्वतंत्र पद्धतीने निवडणूक लढा. तुम्हाला जनता दाखवून देईल, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. ते बारामतीत ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
“शरद पवार ५० वर्षे देशाचे नेते आहेत. पण, विधानसभेला ७० जागांच्यावर कधी गेले नाहीत. मायावती, जयललीता, वाय. एस. आर. रेड्डी बिजू पटनाईक यांनी जे केलं, ते राष्ट्रवादीला करत आलं नाही. राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडलेला पक्ष आहे. मग त्यांनी काँग्रेस पक्ष पळवला असं म्हणायचं का?,” असा सवाल शिवतारे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : मुंबईत भाजपाची ताकद वाढली? महापालिकेत शिवसेनेचा महापौर नसणार? संजय शिरसाट म्हणाले…
बारामती विकास मॉडेलची सगळीकडे चर्चा केली जाते, याबद्दल विचारलं असता शिवतारे म्हणाले, “बारामतीचा विकास म्हणजे शहर आणि आजूबाजूच्या संस्था हेच दाखवलं जातं. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास पाहायचा असेल तर पुरंदर, भोर, खडकवासला, इंदापूरमध्ये जावं. हे सुद्धा लोकांना दाखवलं पाहिजे.”
हेही वाचा : आमदार बच्चू कडू म्हणतात… ‘पुढल्या दीड वर्षात काय होणार, हे आताच सांगता येणार नाही’
“बारामती मतदारसंघात बऱ्याच नुरा कुस्त्या चालू असतात. २ ऑगस्टला मुख्यमंत्री पुरंदरमध्ये आले, असता ४५ हजार लोक उपस्थित होते. बारामतीत सुद्धा तीच परिस्थिती होणार आहे. लोकांची ताकद काय असते, हे बारामतीत लवकरच सिद्ध होईल,” असेही विजय शिवतारेंनी म्हटलं आहे.