Vijay Shivtare : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. यातली चर्चेतली लढत होती ती म्हणजे बारामतीची. बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. सुनेत्रा पवार यांचा पराभव नेमका कसा झाला हे आता विजय शिवतारे यांनी सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या आधी विजय शिवतारे चर्चेत

लोकसभा निवडणुकीच्या आधी विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) चर्चेत आले होते. कारण विजय शिवतारेंनी अजित पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात दंड थोपटले होते. बारामती लोकसभा मतदारसंघावर काही कुणाची मक्तेदारी नाही त्यामुळे या मतदारसंघातून आपणही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही विजय शिवतारे यांनी जाहीर केलं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी शिष्टाई करुन विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांचं बंड शमवलं. आता लोकसभा निवडणूक निकालाचे चार महिने झाल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीत का हरल्या? विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले विजय शिवतारे?

मी १०० टक्के विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र त्याबाबत महायुतीने निर्णय जाहीर करावा. काही विरोधकांनी असा संभ्रम निर्माण केला आहे की विजय शिवतारेंच्या घरात तिकिट मिळालं तर ते लढणार नाहीत त्यांची मुलगी किंवा जावई लढेल. मात्र हा अपप्रचार आहे याला काही अर्थ नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मिळून जेव्हा निर्णय घेतील तेव्हा पुरंदरमधून विजय शिवतारेच लढणार असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. तसंच तिकिट मिळालं नाही तरीही जो निर्णय घेतला जाईल तो अंतिम असेल असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी विजय शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

हे पण वाचा- Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ते एकनाथ शिंदे व्हाया उद्धव ठाकरे! महाराष्ट्राचं राजकीय महाभारत पाच वर्षांत कसं बदललं?

सुनेत्रा पवार का हरल्या? काय म्हणाले विजय शिवतारे?

“महायुती म्हटलं की निष्ठेने काम करावं लागतं. माझा खरंतर राग होता. पण महायुतीचा प्रचार मी लोकसभेला केला. अजित पवारही शब्दाचे पक्के आहेत. सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला कारण जनता काय ठरवते ते अंतिम असतं. मला एवढं माहीत आहे की एक लाख मतं आपली आहेत ती दादांना मिळवून द्यायची. मी काही प्रमाणात कमी पडलो. पण जनतेने जो भावनात्मक निर्णय घेतले. काहीशी भावनिक ही निवडणूक होती. पवार या घरातला प्रश्न असल्याने जे घडलं ते घडलं. अढळराव पाटील लढले त्यांनाही चांगला लीड मिळाला होता. वारं फिरतं तेव्हा काही गैरसमज होतात, फेक नरेटिव्ह तयार केलं जातं, मुस्लिम बांधवांना खोटं बोलून त्यांना फसवलं. मात्र हे दरवेळी होत नाही.” असं विजय शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) सांगितलं. तसंच सुनेत्रा पवार यांचा पराभव का झाला? हे कारण सांगितलं.

महायुतीला चांगलं यश मिळेल

माझी लाडकी बहीण योजना, तरुणांच्या योजना, देवदर्शन योजना या सगळ्या योजना महायुतीच्या महत्त्वाच्या योजना आहेत. कामाच्या जिवावर महाराष्ट्राने प्रगती केली. लोकाभिमुख निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक जास्त पसंती असलेला चेहरा एकनाथ शिंदेंचा आहे असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. तसंच महायुतीला या निवडणुकीत चांगलं यश मिळेल असंही विजय शिवतारेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay shivtare told the reason about sunetra pawar defeat in loksabha election scj