कराड : केंद्र सरकार इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणप्रश्नी हात झटकत असल्याची टीका करताना केंद्राने घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली. काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते. मागासवर्गीयांच्या आरक्षणप्रश्नी काँग्रेस आक्रमक दिसते. पण, राज्य सरकारमधील अन्य दोन पक्ष याविषयी गप्प असल्याबाबत छेडले असता, तसं बिलकुल नाही. महाविकास आघाडीमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत एकमत असल्याचा निर्वाळा देताना पण, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओबीसी आरक्षणाची लढाई काही सोपी नसून, ती जिंकण्यासाठी सर्वानी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. वास्तविक सर्व आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा असल्याने राज्य सरकारसमोर ही खरी अडचण आहे. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण कायम राहावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने याबाबत कायदा करून आरक्षण कायम ठेवा म्हणून केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. पण, त्यावर तोडग्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. समाज पदापेक्षा खूप महत्त्वाचा असल्याने ओबीसी आरक्षणप्रश्नी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार असल्याकडे लक्ष वेधले असता जो राज्य सरकारच्या विरोधात बोलतो, त्याला केंद्र सरकार सुरक्षा पुरवते, तुम्ही जरी राज्य सरकारच्या विरुद्ध बोलायला, लिहायला लागला तर तुम्हालाही केंद्र सरकार सुरक्षा पुरवेल, अशी टिपणी मंत्री वडेट्टीवार यांनी केली.